तुळजापूर प्रतिनिधी :-
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील पीआरओ (PRO) व SISPL सुरक्षा रक्षक हे गेल्या तीन महिन्यांपासून भाविकांकडून व्हीआयपी पास व दर्शन पास देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केला आहे. समितीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांनी याबाबत लेखी निवेदन मंदिर संस्थान तसेच तहसीलदार कार्यालयात सादर केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मंदिर संस्थानातील PRO व SISPL सुरक्षा रक्षक हे भाविकांकडून ५०० ते १००० रुपये घेऊन विशेष दर्शन, मुख्य दर्शन, सोन्याचा रथ दर्शन आदी गेटसाठी व्हीआयपी पास देत आहेत. दरम्यान, प्रत्यक्षात या गेटसाठी शासनमान्य पास शुल्क केवळ २०० रुपये आहे, मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम आकारून भाविकांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या गैरव्यवहारात मंदिर संस्थानातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करत समितीने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, PRO व SISPL सुरक्षा रक्षक यांना तत्काळ निलंबित करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची नेमणूक थांबविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालय व तुळजापूर पोलिस ठाण्याकडेही तक्रार दाखल केली असून, दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिला आहे.
सदर निवेदनावर तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयाने स्वीकृती देत चौकशीसंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे समजते. भाविकांमध्ये या आरोपांमुळे मोठी चर्चा सुरू असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



                                    
