अणदूर / प्रतिनिधी :-
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त धाराशिव पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अधिपत्याखाली, नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या पुढाकाराने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे “एकता दौड वॉक फॉर युनिटी” हा प्रेरणादायी, जनजागृतीपर आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा उपक्रम शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या भव्य उपक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला गेट येथून करण्यात आली. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथे या दौडीची सांगता झाली. संपूर्ण शहरातून “राष्ट्रीय एकता हीच खरी शक्ती, ज्ञान हीच खरी संपत्ती, मुलगी शिकली तर प्रगती झाली” अशा प्रभावी घोषणांचा गजर होत होता. सहभागी पोलीस अधिकारी, युवक, युवती, महिला आणि नागरिकांनी हातात आकर्षक फलक घेऊन देशभक्तीचा संदेश देत “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या जयघोषांनी वातावरण भारावून टाकले.
या उपक्रमात नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे व संतोष गीते, महामार्ग पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अमृता पटाईत, महामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास राठोड , एकता दौडचे जिल्हा संयोजक साहेबराव घुगे, जिल्हा शांतता समिती सदस्य भैरवनाथ कानडे, विलास राठोड, धिमाजी घुगे, मल्लिनाथ गावडे, दिपक घोडके, युवराज पाटील, विक्रांत दुधाळकर, अरविंद पाटील, सुजित दळवी, कमलाकर रणदिवे, सचिन इंगोले , वसंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्या मनोगतात म्हटले, “सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताची पायाभरणी केली आहे. आज ‘एकता दौड वॉक फॉर युनिटी’च्या माध्यमातून आपण सर्वांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करीत राष्ट्रीय ऐक्याची नवी प्रेरणा घ्यावी.”
भैरवनाथ कानडे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “एकता म्हणजे केवळ विचारांचा संगम नाही, ती भावनेची, संस्कारांची आणि कृतीची एकत्र शक्ती आहे. शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा ही एकतेची खरी पायाभरणी आहे.”
साहेबराव घुगे यांनी युवकांना उद्देशून सांगितले की, “युवकांच्या पावलात भारताचे भविष्य आहे. एकतेच्या बळावरच आपण आत्मनिर्भर आणि सशक्त राष्ट्र घडवू शकतो.”
या प्रेरणादायी उपक्रमात नळदुर्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी युवक-युवती, तसेच शहरातील नागरिकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला. महिला व तरुणींनी “मुलगी शिकली तर प्रगती झाली” या संदेशासह समाजात स्त्रीशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
शहरभर देशभक्तीपर घोषवाक्ये, आकर्षक फलक आणि देशप्रेमाच्या रंगांनी सजलेले वातावरण पाहून नागरिकांनी पोलिस दलाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. या एकता दौडीने राष्ट्रभक्ती, सामाजिक ऐक्य आणि शिक्षणाच्या प्रसाराचा सुंदर संगम साधला.
“एक भारत – श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला साकार देत नळदुर्ग पोलिसांनी आयोजित केलेला “एकता दौड वॉक फॉर युनिटी” हा कार्यक्रम केवळ जनजागृती नव्हे, तर समाजाच्या मनावर राष्ट्रीय एकतेचा ठसा उमटवणारा ठरला.




