मित्रचे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांची प्रकल्पास भेट
धाराशिव प्रतिनिधी :-
धाराशिव तालुक्यातील उपळा येथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा चपखल वापर करीत सोयाबीन उत्पादकता वृद्धी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा देशातील पहिला सोयाबीन वृद्धी प्रकल्प आहे. या प्रकल्पास भेट देऊन कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व तज्ञांसोबत प्रकल्पाचा आढावा घेतला.
धाराशिव जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी प्रकल्प राबविण्याचा निर्णय आपण घेतला होता. त्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात १७ मे रोजी भेटही दिली होती. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व इतर तज्ञांसोबत सखोल चर्चा केली होती. त्यानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या तांत्रिक सहकार्याने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
उपळा शिवारात श्री. भागवत विठ्ठल घोगरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी हवामान केंद्र व मृदा सेन्सरचा शुभारंभही केला. या प्रकल्पाअंतर्गत हवामान आधारित (Weather-Based) व मृदा संवेदक आधारित (Soil Sensor-Based) २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १० शेतकरी हवामान आधारित तर १० शेतकरी मृदा संवेदक आधारित आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. ‘फुले स्मार्ट PDMA’ ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान अंदाज, सिंचन, रोग-कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन आदी मार्गदर्शन दिले जात आहे. BBF पद्धतीने पेरणी, ड्रोनद्वारे पिकांचे परीक्षण व फवारणी, ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन पद्धतींचा वापर, अशा विविध मानकांचा आधार घेऊन शेती सल्लाही दिला जात आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांसोबत बैठक घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीतून उत्पन्न वाढवा, असे आवाहन केले. अडचणी आल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, ड्रोनचा वापर फक्त फवारणीपुरता मर्यादित न ठेवता पीक निरीक्षणासाठीही करावा, असेही नमूद केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आसलकर, तालुका कृषी अधिकारी श्री. देवकते, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. पेरके, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे हवामान तज्ञ श्री. हारवाडीकर यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतीमध्ये पुढील काळात ड्रोनचा वापर अनिवार्य होणार आहे. फवारणी बरोबरच पिकांचे निरीक्षण करण्यासाठी फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. यावर आधारित वेळोवेळी योग्य औषधे, त्यांचे प्रमाण व इतर मार्गदर्शन शेतकऱ्यांना याठिकाणी दिले जाणार आहे.
प्रकल्पात सहभागी शेतकरी व संबंधित अधिकारी यांचा एक व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाईल. तसेच दिलेल्या सूचना व कार्यवाहीचे ट्रॅकिंग करण्यात येणार असून, त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन व नियंत्रण प्रभावीपणे करता येणार आहे.