स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करावी
आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी
मुख्य सूत्रधाराची पाळेमुळे खणून काढावीत
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) –
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण अतिशय भयानक आहे. या व्यसनामध्ये जवळपास ५०० नवतरुण व युवक गुरपटलेले आहेत. तर ९ जणांचा यामुळेच बळी देखील गेलेला आहे. हे ड्रग्ज मुंबई, पुणे, सोलापूर व परंडा मार्गे तुळजापुरात पुरवठा करणारे मोठे रॅकेट असून या रॅकेटमध्ये भाजपच्या मंडळीचा सक्रिय सहभागी आहेत. त्यामुळे त्या आरोपींना सत्ताधारी भाजपचे आमदार त्यांना वाचवीत असल्याचा सणसणाटी व खळबळजनक आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी दि.१६ मार्च रोजी केला.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष खालील सय्यद, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुतवळ व उमेश राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, तुळजापूर शहर व तालुक्यात ड्रगचे जाळे पसरलेले आहे. मात्र, मागील महिन्यापासून त्याची माहिती समोर आली आहे. ड्रगच्या व्यसनामध्ये जवळपास ५०० नवतरुण युवक गुरफटले असून ते व्यसनाधीन झालेले आहेत. तर ९ जणांचा या व्यसनाच्या आहारी जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पूर्वी जी ड्रगची पुडी ३ हजार रुपयाला मिळत होती. तीच पुडी आज ९ हजार रुपयांना मिळत असल्याचे सांगत त्या ड्रग्जची दाहकता किती भयानक आहे ? याचे वास्तव त्यांनी मांडले. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देखील तीन वेळेस तुळजापुरात परत परत ड्रग्ज कसे सापडतात ? त्यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी देशमुख यांची भेट घेऊन सर्व आरोपींना पकडावे अशी मागणी केली. पोलिसांनी आजपर्यंत संगीता गोळेसह इतर १६ आरोपींना पकडले असून मुख्य आरोपींना पोलीस का पकडत नाहीत, पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव आहे ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. विशेष म्हणजे संगीता गोळे या ड्रग्ज माफीयाकडे जी आर्थिक माया आहे. त्यामधील अर्धी माया ही तुळजापूरमधून आरटीजीएस व फोन पे द्वारे गोळेंच्या खात्यावर ट्रान्सफर केली असल्याचा आरोपी त्यांनी केला. हे जिल्ह्यातील रॅकेट उद्ध्वस्त करायचे असेल तर त्याची पालेमुळे खोदून काढावीच लागतील असा इशारा देत ते म्हणाले की, आरगडे, पिंटू मुळे, दळवी यासह पकडण्यात आलेले सर्व आरोपी हे भाजपाशी संबंधित आहेत. तर पोलिसांनी न्यायालयाला चार आरोपींची नावे गोपनीय पद्धतीने दिली आहेत. मात्र मुख्य सूत्रधार देखील भाजपचा असून त्यांना सत्ताधारी मंडळी वाचवीत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. तसेच पकडण्यात आलेल्या गोळेच्या अकाउंटवर जे पैसे सापडलेले आहेत. त्यातील अर्धे पैसे तुळजापूरवरून गेलेले आहेत. विशेष म्हणजे पत्रकारांच्या माध्यमातूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य म्हणाले की, आमचा आणि पिंटू मुळेचा काही संबंध नाही. परंतू मुळे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. मुळेचे फोटो आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोबत दिसत आहेत. पुढील पिढी जर व्यवस्थित आणि शाबूत ठेवायची असेल तर ड्रग्जची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी स्पेशल एसआयटी टिम नेमून आरोपींची नार्को टेस्ट करुन आरोपीवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. कारण तुळजापूर शहरांमध्ये जे-जे आरोपी यामध्ये सापडतात ते कोणाशी संबंधित आहेत ? ४ आरोपींची नावे पोलिसांनी गोपनीय पद्धतीने कोर्टात नावे सादर केलेली आहेत, ती नावे का ओपन करीत नाहीत ? हे जे जाळ तुळजापूर शहरात पसरविले आहे. हे सर्व आरोपी भाजपचेच कार्यकर्ते असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. तर कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून आरोपींची नावे देखील समोर येतील. परंतू छोट्या छोट्या माशांना पकडले असून मोठा मासा पकडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्य आरोपी सूत्रधार पकडल्याशिवाय तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण उघड होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी ७२ तासांमध्ये या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा छडा लागलेला नसल्यामुळे आम्ही असमाधान आहोत. कारण या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे मोकाट आहेत. त्यामुळे चौकशीच्या माध्यमातून सगळेच उघड करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये गृहमंत्री, गृहराज्यमंत्री व पालकमंत्री यांना भेटून यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जर मुख्य सूत्रधारला पकडले नाही. तर जनआंदोलन करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.
…..
२५ हजार रुपये देऊन अल्पवयीन मुलींचा वापर !
मुंबई, पुणे मार्गे सोलापुरात ड्रग्ज आणले जात होते. मात्र सोलापुरातून तुळजापुरला आणताना ते ड्रग्ज पोलिसांनी पकडू नये. तसेच कुठलीही रिस्क नको म्हणून अल्पवयीन मुलांना सोलापूर शहर व तामलवाडी येथील टोल नाका ओलांडून ते तुळजापूरात आणण्यासाठी चक्क अल्पवयीन मुलांचा वापर केला जात होता. त्यासाठी २५ हजार रुपये त्या मुलांना देण्यात येत होते. हे रॅकेट गेल्या चार वर्षापासून तुळजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालत आहे. हे ड्रग्ज माफीया मंडळी सत्ताधारी आमदाराचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना भाजपचे आमदार वाचवण्याचे काम करीत असल्याचा थेट आरोप करण्यात आला. तुळजापूर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तरुण व्यसनाधीन झाल्यामुळे तुळजापूर येथे मंदिर संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करावे अशी उपहासात्मक मागणी देखील त्यांनी केली.