धाराशिव प्रतिनिधी :-
शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार/ नोकरी इच्छुक उमेदवार यांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव आणि तेरणा युथ फाऊंडेशन तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक उमेदवारांना रोजगाराच्या संधी यामाध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून तब्बल ७२१ जणांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. आणखी १९७ जणांची प्राथमिक निवड झाली आहे. त्यापैकी काही उमेदवारांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले असून, राहिलेल्या उमेदवारांना सुद्धा देखील लवकरच नियुक्ती पत्र मिळणार आहे. या रोजगार मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील २२ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने पुणे, मुंबई, सोलापूर, बार्शी, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील कंपन्यांचा समावेश होता.
या मेळाव्याचे उद्घाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, तेरणा ट्रस्टचे विश्वस्त सतीश दंडनाईक, कौशल्य विकास विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या उपायुक्त मा.विद्या शितोळे, जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, उद्योजक संजय देशमाने तेरणा ट्रस्टचे समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष म्हणाले की, मूलभूत कौशल्य आयुष्यात खूप महत्त्वाचे असून तुम्ही फक्त डिग्री घेऊन चालत नाही. तर त्यासाठी मूलभूत कौशल्यांना आत्मसात करावं लागतं. तेव्हाच तुमच्यामधील गुणवत्ता सिद्ध होते. विद्यार्थ्यांनी टेक्स्ट बुक, रिसर्च पेपर व विविध ट्रेनिंग याविषयीही सजग राहून कौशल्य विकसित करून शाश्वत उपर्जनासाठी स्वतःला सतत अद्यावत ठेवलं पाहिजे. इंटरनेटचा वापर वाढलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सतत होत असलेली अद्ययावत प्रगती याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.
यावेळी बोलताना तेरणा ट्रस्ट चे विश्वास सतीश दंडनाईक म्हणाले की, उद्योगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्याचे नेते आदरणीय राणाजगजीतसिंहजी पाटील साहेब सतत प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयामध्ये हा मेळावा भरलेला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. यावेळी उपायुक्त विद्या शितोळे यांनीही उद्योग क्षेत्रामध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की एक वेळ उद्योग टाकणं सोप आहे पण उद्योग टिकवण्यासाठी उद्योजकांमध्ये प्रचंड चिकाटी असणे गरजेचे आहे. तेव्हाच उद्योग यशस्वी होऊ शकतो. यावेळी किया मोटर्स, सोलापूरहुन आलेले बनकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या प्रास्ताविक पर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला उज्वल यशाची परंपरा असून महाविद्यालय पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित विविध अभ्यासक्रम ,विविध कोर्सेस महाविद्यालयामध्ये सातत्यपूर्ण राबवत असून याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयाचे विद्यार्थी सतत चांगल्या कंपनीमध्ये प्लेस होतात. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी उद्योजक झालेले आहेत. त्यांनी इतरांना नोकरी दिलेली आहे. त्यामुळे आयोजित केलेल्या या मेळाव्यामधून सुद्धा मूलभूत कौशल्य अंगी असलेले अनेक विद्यार्थी अनेक कंपन्यांना मिळणार आहेत. आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
Ranajagjitsinha Patil