धाराशिव प्रतिनिधी (दि. 10) :-
निवडणुकीपुरतं लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका भाऊ आता प्रत्यक्षात जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा हे तीनही घटक अर्थसंकल्पातुन गायब झाल्याचे दुर्देवी बाब आज दिसून आल्याचं आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु म्हणणारे आज चकार शब्द बोलले नाहीत. लाडकी बहीणीला 2100 रुपये देण्याचं आश्वासन हवेतच विरलं आहे. लाडक्या भावाचा तर उल्लेख सुद्धा सरकारने केला नाही. त्यामुळं हे तीनही घटक फक्त निवडणुकीपुरते होते हे आता सिद्ध झाल्याचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे. याशिवाय भावांतर योजनेच्या माध्यमातून हमीभाव न मिळालेल्या शेतकऱ्यांना फरक म्हणून रक्कम देणार असं वचन सरकारने जाहीरनाम्यात दिलं होत. पिकासाठी आवश्यक निविष्टा खरेदी करताना राज्याचा जीएसटीतुन शेतकऱ्यांना सूट देणार असंही सांगण्यात आलं होत त्यावरही सरकार काहीच बोलल नाही. निवडणुकीत नुसत्या घोषणा करणाऱ्या सरकारच खरं रूप यनिमित्ताने समोर आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.जिल्ह्याचा विचार करता कृष्णा मराठवाडा प्रकल्प, टेक्निकल टेक्सटाईल पार्क, वैद्यकीय महाविद्यालय याबाबतही पदरी निराशा झाली आहे. एका बाजूला गोसी खुर्द प्रकल्पासाठी दीड हजार कोटीची तरतूद होते त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासही भरघोस निधीची अपेक्षा होती ती फोल ठरली आहे.