मुरूम / प्रतिनिधी (ता. १०) :-
केसरजवळगा, ता. उमरगा येथील विरक्त मठ येथे शिवरात्री निमित्ताने जागतिक महिला दिन शनिवार (ता. ८) रोजी विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सोलापूरच्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्राचे प्रमुख ब्रह्माकुमारी राजयोगिनी सोमप्रभा दिदिजी होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विरक्त मठाधिपती श्री म. नी. प्र. विरंतेश्वर महास्वामीचे प्रवचन झाले. ब्रह्माकुमारी सोमप्रभा दीदी यांनी महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य सांगत असताना उपवास व जागरण व शिव अवतरणाचे महत्त्व अत्यंत सुलभ व सहजरीत्या स्पष्ट केले. काम, क्रोध, लोभ, मोह अहंकार रुपी अवघड व्यक्तीने बाजूला काढले पाहिजेत. महास्वामीजीनी ब्रह्मा, विष्णू, शंकर यांचे महत्त्व सांगून सोमप्रभा दीदीच्या विचारांचे कौतुक करत सर्वांचे अत्यंत प्रेमभाव व सन्मानाने स्वागत केले. ब्रह्माकुमार राजूभाई भालकाटे यांनी सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत केले. याप्रसंगी येरमाळा येथून आलेले ब्रह्माकुमार वैजनाथभाई यांनी मंच संचलन करून शिव परमात्म्याचा परिचय दिला.
तसेच लोहारा येथील ब्रह्माकुमारी सरिता बहनजी व लक्ष्मी बहनजी यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच अमोल पटवारी, माजी सरपंच संगमेश्वर घाळे, माजी निवृत्त पोलिस उपनिरीक्षक कोरे आदींची विशेष उपस्थिती होती. गावासह खंडाळा गाव, भुरीकवठा, कदेर, दाळिंब, कवठा, मुरूम, येणेगुर, लोहारा या ठिकाणावरून भाई-बहीणी उपस्थित होत्या.
प्रारंभी महास्वामी व सोमप्रभा दीदी यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी पाठशाला येथे शिव ध्वजारोहण करण्यात आले. ब्रह्माकुमारी शिल्पा बहन यांनी आभार मानले. फोटो ओळ : केसरजवळगा, ता. उमरगा येथील विरक्त मठात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करताना मान्यवर व अन्य.