धाराशिव / प्रतिनिधी :- (दि.५ मार्च)
जिल्ह्यात पर्यटन,शेती आणि पाणी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देत सर्वसमावेशक योजना राबवण्यात येतील,असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज ५ मार्च रोजी विविध यंत्रणांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री. पुजार बोलत होते.
या सभेला प्रायमूव्ह पुणे संस्थेचे अजित फडणीस,जितेंद्र नाईक,सचिन रुपेकर,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे व शेषराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील सातवाहन काळातील मंदिरे,ऐतिहासिक गड-किल्ले,तसेच तुळजापूरसारखी तीर्थस्थळे यांना एकत्रित करून “टूरिस्ट सर्किट” तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले,जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक पर्यटन स्थळांना भेट देता यावी यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक व्यवसाय आणि महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संस्थांनी (FPO) मूल्यसाखळी विकसित करावी,असे आवाहन श्री. पुजार यांनी केले.सूक्ष्म सिंचन असलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाईल, तसेच त्यांच्या उत्पादनांची विक्री महामार्गालगत करण्यासाठी नियोजन करण्यात येईल.जलसंधारण यावर भर देण्यात येणार असून,जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. असे त्यांनी सांगितले.
या वर्षी जिल्ह्यात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग असणार आहे.वृक्ष लागवडीसाठी योग्य जागांची निवड, रोपवाटिकांचे नियोजन आणि वृक्ष संगोपनासाठी जबाबदारी निश्चित करणे यावर भर दिला जाणार आहे.
श्री.पुजार यांनी स्पष्ट केले की, पर्यटन,शेती आणि पाणी व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये प्रभावी सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व यंत्रणांना एकत्र आणून कार्य करणार आहे.या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल आणि विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सहविचार सभेला जिल्हा जलसंधारण अधिकारी सी.आर. राऊळ,सामाजिक वनीकरणचे वनाधिकारी व्ही.के.करे,विभागीय वन अधिकारी सी.ए.पोळ,मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी.व्ही कट्टे,जलसंधारण अधिकारी व्ही.बी पाटील,लघु पाटबंधारे विभागाच्या मोनाली तोटावाड,स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी सी.जी.जाधव,लघु पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता व्ही.आर.पाटील,ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक एन.के.व्हटकर आणि जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जे.केत यांची उपस्थिती होती.