धाराशिव प्रतिनिधी :-
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुरु झालेल्या नळदुर्ग- अक्कलकोट रस्त्याचे काम अंतिम टप्यात आले असून या कामामुळे या रस्त्यावरील १० पेक्षा जास्त गावातील नागरिकांचा खराब रस्त्यामुळे सुरु असलेला वनवास संपणार आहे. हे काम पूर्णत्वास आले असून आता पुन्हा एकदा पूर्वी सारखी नळदुर्ग-अक्कलकोट वाहतूक जोमात सुरु होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नळदुर्ग- अक्कलकोट रस्त्याचे काम शेतकरी आणि प्रशासन यांच्या वादात रखडत पडले होते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीचा मावेजा मिळावा यासाठी या कामाला विरोध करून याप्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम बंद पडले होते. त्याचबरोबर या रस्त्यावरील येडोळा, वागदरी, गुजनूर, शहापूर, दहिटणा, गुळहली, निलेगाव, पाटील तांडा, खुदावाडी आणि देवसिंगा नळ या गावातील नागरिकांनाही या खराब रस्त्याचा कमालीचा त्रास होत होता.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या यांनी नळदुर्ग- अक्कलकोट रस्ता सध्या अस्तित्वात व वापरात असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम व्हावे यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले.