उमरगा /प्रतिनिधी(ज्ञानेश्वर गुरव ):-
धाराशिव व लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मंगळवारपासून (दि.4व 5मार्च ) या दोन दिवस उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणी पासून औषधोपचार, तसेच आवश्यक शस्त्रक्रियापर्यंतची सुविधा राहणार आहे. याशिवाय महार रक्तदान शिबिरासह दिव्यांग आणि वयोवृद्धांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन, महाआरोग्य शिबिराचे प्रमुख शरण बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी केंद्रीय मंत्री भगवान खुबा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच. पुजार अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी ह्रदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, नेत्र, कान, नाक, घसा,पोटाचे विकार आधी आजारावरील मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. उमरगा- लोहारा तालुकासह लातूर जिल्ह्यातील येणाऱ्या सर्व रुग्णावर मोफत तपासणी व औषध उपचारासह मोफत शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन शिबिरा निमित्त करण्यात आले आहे.
(दि 5)रोजी महारक्तदान शिबिराचे चे देखील आयोजन आहे, तसेच तालुक्यातील व परिसरातील दिव्यांग व वृद्धांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
लातूर, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यासह उमरगा तालुक्यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. शिबिरात औषध वाटप कक्ष, रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था, तसेच रुग्णांना ये- जा करण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. लायन्स क्लब, विवेकानंद हॉस्पिटल लातूर, महा लॅब,श्रीकृष्ण रक्तपेढीसह विविध संस्थांचे सहकार्य मिळत असल्याचे भाजप युवा नेते शरण पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत माजी सभापती सचिन पाटील, रफिक तांबोळी, शौकत पटेल, योगेश राठोड,दगडू पाटील, महेश माशाळकर उपस्थित होते.