जळकोट, दि.२(मेघराज किलजे) :-
केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यावेत. या मागणीसाठी सोमवार (दि .३) रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टर (रॅली) मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी दिली आहे.
केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे सध्या शेतकरी वाऱ्यावर आहे. असे सांगून धीरज पाटील यांनी आंदोलनाच्या मागण्या संदर्भात माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, या मोर्चात प्रमुख मागणी आम्ही लावून धरणार आहोत. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने कर्जमाफी सारखे अनेक आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर विसर पडलेला दिसत आहे.
शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार होते. त्याचे काय झाले? मागेल त्याला सौर पंप अनेक शेतकऱ्यांनी नोंदी केल्या प्रत्यक्षात अजुन एकालाही मिळाला नाही . रोजगार हमी योजनाची कामे चालू कधी होणार.ती तातडीने चालू करावीत.तुळजापूर, तामलवाडी ड्रग्स प्रकरणात सखोल चौकशी करून पकडलेल्या आरोपीचे सी.डी.आर तपासून कारवाई करावी.
ठिबक, तुषार सिंचनचे अनुदान अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ते देण्यात यावे.
कृषी विभागा अंतर्गत अनुदानावर वाटप होणारे बी बियाणे व औषधे हे ठेकेदारामार्फत खरेदी न करता शेतकऱ्यांना स्वतः खरेदी करण्याची परवानगी मिळावी.महायुती सरकारच्या साक्षीने नंबरप्लेटच्या माध्यमातून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे तिप्पट पट वाढ करण्यात आलेली आहे.ती वाढ कमी करून वाहनधारकाना दिलासा देण्यात यावा.
असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. या कारणास्तव शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आदि मागण्यासाठी सोमवार दि. ३ मार्च पासून राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावेत या मागणीसाठी सोमवार(दि.३ मार्च ) रोजी सकाळी ११ वा. धाराशिव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, खाजानगरपासून शेतकरी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा ट्रॅक्टर रॅली मोर्चा काढण्यात येणार आहे.
तरी सर्व शेतकरी, नागरिक,प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस आजी माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज संस्थाचे माजी पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक कॉंग्रेस, सर्व फ्रंटल, सेलचे जिल्हा, तालुका अध्यक्ष, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केले आहे.