खुदावाडी पं. स. गटातून पद्माकर पाटील निवडणूक रिंगणात उतरणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाकडून मागणी
धाराशिव प्रतिनिधी :-(सतिश राठोड)
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पद्माकर पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खुदावाडी पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटाची अधिकृत उमेदवारी पद्माकर पाटील यांना मिळावी, अशी ठाम मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
पद्माकर पाटील यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. येडोळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल १०१ घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावत आदर्श सरपंच म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
पद्माकर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते असून पक्षवाढीसाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी तळागाळात काम केले असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास आहे.यासंदर्भात बोलताना पद्माकर पाटील म्हणाले, “पक्षाने मला संधी दिली तर ती संधीचं सोनं करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन. सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत राहीन.” दरम्यान, खुदावाडी पंचायत समिती गटात पद्माकर पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.




