धाराशिव (सतीश राठोड ) : —
तुळजापूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नंदगाव गटात भारतीय जनता पक्षाकडून विवेकानंद मेलगिरी हे निवडणूक आखाड्यात उतरणार असून ते भाजपाकडून इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे नंदगाव गटातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
विवेकानंद मेलगिरी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात सिंदगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून केली. सरपंच म्हणून काम करत असताना त्यांनी गावाच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि विविध विकासकामांवर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख निर्णय राबवण्यात आले, ज्यामुळे ग्रामस्थांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी सहकारी संस्थांमध्येही जबाबदारीने काम करत नेतृत्वगुण सिद्ध केले. सोसायटीतील कामकाजात पारदर्शकता, शेतकऱ्यांचे हित आणि आर्थिक शिस्त यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. यामुळे त्यांची ओळख केवळ स्थानिक नेते म्हणूनच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले लोकप्रतिनिधी म्हणून निर्माण झाली आहे. विकासाभिमुख विचारसरणी, संघटन कौशल्य आणि जमिनीवरील कामाचा अनुभव ही त्यांची प्रमुख ताकद मानली जात आहे. “नंदगाव गटाचा सर्वांगीण विकास, युवकांना संधी, शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य” हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे विवेकानंद मेलगिरी यांनी बोलताना सांगितले.




