धाराशिव (सतिश राठोड ) :-
तुळजापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद पिंटू भैय्या गंगणे यांचा पदग्रहण सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक क्षणी बंजारा समाज बांधवांनी नगराध्यक्ष पिंटू गंगणे यांचा जाहीर सन्मान केला.
नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यास शहरातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंजारा समाजाच्या वतीने बोलताना समाज प्रतिनिधींनी सांगितले की, पिंटू गंगणे यांनी नेहमीच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम केले असून, बंजारा समाजाच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका सकारात्मक राहिली आहे.यावेळी बंजारा बांधवांनी नगराध्यक्षांकडून समाजाच्या मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व वसाहत विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. नगराध्यक्ष पिंटू गंगणे यांनीही बोलताना म्हणाले की, सर्व समाज घटकांना समान न्याय देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. “हे पद माझ्यासाठी सन्मानासोबत मोठी जबाबदारी आहे. शहरातील प्रत्येक समाज, प्रत्येक घटकाचा विकास हेच माझे ध्येय आहे. बंजारा समाजाने दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
पदग्रहण सोहळ्यानिमित्त परिसरात आनंदाचे वातावरण असून उपस्थितांनी नगराध्यक्षांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. हा सोहळा सामाजिक सलोखा आणि एकतेचे प्रतीक ठरला. याप्रसंगी तांडा समृद्धी योजनेचे विभागीय सदस्य प्रवीण पवार, सुरेश राठोड, बाजार समितीचे सहसचिव शिवानंद राठोड, प्रकाश राठोड सह बंजारा बांधव उपस्थित होते.




