धाराशिव : (२३डिसेंबर) :-
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये धाराशिव जिल्ह्यात महायुतीने ऐतिहासिक यश संपादन करत आठही नगरपालिकांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या दणदणीत विजयाबद्दल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महायुतीने *शाश्वत, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख* मुद्द्यांवर निवडणुका लढविल्या. या विकासाच्या अजेंड्याला सर्वसामान्य जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजेच हे भरघोस यश असल्याचे त्यांनी नमूद केले. धाराशिव जिल्ह्यात उमरगा ,कळंब ,परांडा ,भूम येथे शिवसेना नगराध्यक्ष तसेच धाराशिव ,तुळजापूर ,नळदुर्ग ,मुरुम येथे भाजपा नगराध्यक्ष विजयी झाले आहेत .
“ जनतेने आमच्या स्थानिक नेतृत्वावर दाखविलेला विश्वास हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी महायुतीचे शीर्ष नेतृत्व नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,” असा विश्वास व्यक्त करत, भविष्यात सक्षम, समृद्ध आणि विकासाभिमुख धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्माणासाठी महायुती कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.




