तुळजापूर,( दि. ५ नोव्हेंबर)
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने जिल्हाभरातील पंचायत समिती, नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. समितीने भ्रष्टाचाराच्या विरोधातील झेंडा उंचावत, पारदर्शक व प्रामाणिक प्रशासनासाठी हाक दिली आहे.
सध्या जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीचे बागुल वाजले असून तुळजापूर, नळदुर्ग, परंडा, भूम, वाशी, लोहारा, उमरगा व धाराशिव या आठ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना संधी देत निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. या उमेदवारांद्वारे पैशाच्या जोरावर चालणाऱ्या भ्रष्ट राजकारणाला पर्याय देण्याचा समितीचा निर्धार आहे.
जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले की, “ही निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून, समाजातील भ्रष्टाचाराविरुद्ध उभं राहण्याची लढाई आहे. आमचे उमेदवार पैशाच्या, प्रतिष्ठेच्या व जातीय राजकारणाच्या विरोधात उभे राहतील. लोकशाहीत जनतेच्या मतांचा सन्मान आणि स्वच्छ प्रशासन यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आदेशाने ही निवडणुकीत उमेदवारी देणारे येणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.
समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत. तळागाळातील नागरिकांशी थेट संवाद साधून भ्रष्टाचाराच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्याचे अभियान राबवले जात आहे. जनतेच्या सहकार्याने परिवर्तन घडवून आणण्याची समितीची भूमिका असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
लवकरच समिती जिल्हाभरातील उमेदवारांची अधिकृत घोषणा करणार आहे. या उमेदवारांद्वारे भ्रष्टाचारमुक्त, जबाबदार आणि लोकहिताचे प्रशासन देण्याचा नवा पर्याय मतदारांसमोर मांडला जाणार आहे. जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत या संघर्ष समितीच्या उमेदवारांमुळे पारंपरिक राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




