धाराशिव प्रतिनिधी :-
धाराशीव आगारातील “MSRTC सुपरफास्ट नाईट क्वीन” (क्रमांक MH09 FL 0548) ही धाराशीव-पुणे-बोरीवली मार्गावर धावणारी एसटी बस समोरील काच आधीपासून फुटलेली असतानाही मार्गावर सोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस बस प्रवास करत असताना चालकाला समोरचा रस्ता नीट दिसत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. वारा, धूळ आणि कीटक थेट चालकाच्या चेहऱ्यावर येत असल्याने बस चालविणे अत्यंत अवघड झाले होते. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी ही बस प्रवाशांसह मार्गावर धाववली.
या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून त्यांनी थेट सवाल केला आहे “काच फुटलेली बस रस्त्यावर कशी? जबाबदारी कोणाची?” तसेच “पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकाराकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.
एसटी विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून अशा तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण वाहनांना त्वरित बंद करावे, अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.




