उमरगा (प्रतिनिधी) :-
आदर्श महाविद्यालय, उमरगा येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने च्या वतीने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ बुधवार दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकीचे प्राचार्य डॉ. हरिदास फेरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रबोधनपर मार्गदर्शनातून नवागत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विशेषतः त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) मधील महत्त्वपूर्ण बाबी विद्यार्थ्यांसमोर मांडून आजचा विद्यार्थी विविध कौशल्याने परिपूर्ण असने अपेक्षित आहे असे मत व्यक्त केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे बहुशाखीय शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून विद्यार्थ्यांना कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखांतून स्वतंत्र अभ्यासक्रम निवडण्याची लवचिकता मिळते. ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना इच्छेनुसार ३ वर्षांत पदवी किंवा ४ वर्षांत ऑनर्स पदवी घेण्याची सुविधा मिळते. कौशल्य विकास, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकता व डिजिटल शिक्षण यावर भर देण्यात आला आहे अशा विविध घटकांना स्पर्श करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कला, क्रीडा, संस्कृती आणि जीवनकौशल्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे हे अधोरेखित केले. डॉ. फेरे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “शैक्षणिक ज्ञानाबरोबरच कौशल्यविकास, तंत्रज्ञानाचे भान, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी अंगीकारली तरच आपण खऱ्या अर्थाने उद्याचे सक्षम नागरिक होऊ शकतो.”
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम सोलंकर यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधींचा व महाविद्यालयातील विविध तज्ञ प्राध्यापक व विविध शैक्षणिक सोयी सुविधांचा योग्य फायदा करून घ्यावा, असे प्रतिपादन केले. पदव्युत्तर विभागाचे प्रभारी प्रा. शिरिष रेड्डी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) समन्वयक प्रा. डॉ. सुधीर मठपती यांनी केले. संचालन प्रा. डॉ. धनंजय मेनकुदळे यांनी तर आभार डॉ. संजय दुलगे यांनी मानले.