धाराशिव न्यूज रिपोर्टर:-विजय पिसे जळकोट
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जळकोट येथे दहीहंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे व हंडीचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार उपाध्यक्ष शकील मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निळकंठ इटकरी सर यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक सणांचे महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापिका रेणुके मॅडम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना परंपरा, एकता आणि सहकार्याची जाणीव ठेवून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीनी गवळणी वर आकर्षक टिपरी नृत्य सादर करून उपस्थितीताना भारावून सोडले. गोपाळकाला, नृत्य, व भजन यांच्या माध्यमातून कृष्णजन्माचा उत्सव सादर केला. छोट्या गोकुळातील बाळकृष्ण व गोपिकांच्या वेशात आलेल्या बालकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर लहान गोविंदांनी पारंपरिक पद्धतीने थर लावून दहीहंडी फोडण्याचा रोमांचक उपक्रम राबविला. “गोविंदा आला रे आला” या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. दहीहंडी फुटताच सर्वत्र जल्लोष झाला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सामूहिक कार्यभावना अनुभवण्याजोगी होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुके मॅडम, इटकरी सर, अभिवंत सर, वनवे सर, मुरमुरे सर, चव्हाण सर, कुडकले सर, आहेरकर सर व श्रीकांत कदम सर यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा दहीहंडी सोहळा शाळेच्या वार्षिक उपक्रमांमध्ये अविस्मरणीय ठरला असून विद्यार्थ्यांच्या मनावर गोड आठवणींची छाप सोडून गेला.
या कार्यक्रमासाठी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.