धाराशिव / प्रतिनिधी :- (दि.४ ऑगस्ट )
खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती,मात्र आता ती १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी,बाजरी,मूग, उडीद,कापूस,मका व कांदा या पिकांची पेरणी केली आहे,त्यांनी विहित विमा हप्ता भरून योजनेत अर्ज करावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.पीक विमा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र,सातबारा व ८ अ उतारा,आधार कार्ड,शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Agristack Farmer ID),बँक पासबुकची झेरॉक्स प्रत यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी हे कागदपत्र घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर,किंवा बँकांद्वारे पीक विमा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा.शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तात्काळ अर्ज करून आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.