धाराशिव न्यूज रिपोर्टर:-विजय पिसे जळकोट
भोसगा (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे पेय जल समृद्ध गाव उपक्रमांतर्गत गाव पातळीवरील पाणी पुरवठा समिती व विविध पदाधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश गाव विकास प्रक्रियेत पाणी पुरवठा समितीची भूमिका अधोरेखित करणे, तसेच समिती कार्यक्षम व सक्रीय व्हावी यासाठी सदस्यांना त्यांच्या कर्तव्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करणे हा होता.
सदर प्रशिक्षणामध्ये दुष्काळाचे प्रमुख कारणे, पाण्याच्या संदर्भातील स्थानिक समस्या, त्यावरील संभाव्य उपाययोजना, तसेच जलसंधारणाच्या शाश्वत पद्धती यावर सखोल चर्चा झाली. याशिवाय, पेयजलासाठी अस्तित्वात असलेल्या शासकीय योजना, ‘जल जीवन मिशन’, ‘जलस्वराज्य अभियान’, इत्यादींचा गावस्तरावर प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, याचे विश्लेषण करण्यात आले.
गावाच्या पाणी नियोजनासाठी आवश्यक असलेले ‘जल अंदाजपत्रक’ कसे तयार करावे, याविषयी उपस्थितांना प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे विषय सादरीकरणासोबतच विविध संवादात्मक उपक्रम, चर्चासत्र व प्रात्यक्षिकांचा समावेश होता, ज्यामुळे उपस्थितांना संकल्पना अधिक सोप्या भाषेत समजून घेता आली.
हे प्रशिक्षण पर्यावरण कारभारणी प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक श्री. मुकेश सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यांनी आपल्या सुस्पष्ट आणि सहज शैलीत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे आयोजन रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (RSCD), मुंबई व ASAR India यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. गावातील पाणी पुरवठा समिती सदस्य, ग्रामपंचायत प्रतिनिधी, युवा कार्यकर्ते, महिला बचत गट सदस्य, अंगणवाडी कर्मचारी आणि नागरिक यांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप वितरण करण्यात आले
गावाचा जलविकास, शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापन आणि सामूहिक सहभाग या दिशेने भोसगा गावाने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे.
याप्रसंगी गावचे सरपंच व्यंकट कागे, उपसरपंच सुभाष बिराजदार, माजी उपसरपंच वैजिनाथ कागे, जी. प. शाळेचे मुख्याध्यापक एम एम डोखले, पदवीधर शिक्षक सोमनाथ चीनगुंडे, सामाजिक कार्यकर्ते यल्लालिंग एकुंडे, धनराज टेंगळे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद सोनकांबळे, आपाराव पाटिल, सुलताना शहा, आशा कार्यकर्ती अंगणवाडी सेविका, बचत गट प्रतिनिधी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी बनशेट्टी आप्पा तर प्रास्ताविक जिल्हा समन्वयक मुकेश सोनकांबळे व आभार प्रदर्शन पर्यावरण सखी तथा पोलीस पाटील डॉ ज्योती हत्तरगे यांनी केले .