धाराशिव प्रतिनिधी :-
सेवा भारती देवगिरीच्या वतीने शहरातील फकिरा नगर येथे लहान मुलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले रविवारी दि २० रोजी १ ते १२ वर्ष वयोगटातील लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात लहान मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आवश्यक त्या औषधांचे मोफत वाटपही करण्यात आले. या उपक्रमात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या दातांच्या समस्या, संसर्गजन्य आजार आणि पोषणाशी संबंधित त्रास यावर डॉ. अजित बुरगुटे यांनी प्राथमिक उपचारांसह मार्गदर्शन केले. आरोग्यविषयक जनजागृती करताना त्यांनी पालकांनी मुलांच्या दैनंदिन आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. सदर आरोग्य शिबिरात सेवा भारती जिल्हाध्यक्ष डॉ. प्रसाद धर्म, सेवा भारती सचिव डॉ. शतानंद दहिटणकर, सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक डॉ. हर्षल डंबळ, डॉ. निखिल चव्हाण, डॉ. पंकज शहाणे, तसेच के. टी. पाटील फार्मसी कॉलेज, धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच सेवा भारती देवगिरी संस्था शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून, त्यांच्या विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या दुर्बल घटकांपर्यंत सेवा पोहचवली जाते. फकीरा नगर हा परिसर सेवा भारतीने दत्तक घेतला असून, दर एक ते दोन महिन्यांनी येथे नियमितपणे महिलांसाठी व मुलांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी व वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या उपक्रमामुळे फकीरा नगर परिसरातील नागरिकांमध्ये सेवा भावनेचा आणि आरोग्यविषयी जागरूकतेचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे.
- Advertisement -