धाराशिव प्रतिनिधी –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींजींची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कवड्याची माळ घालून स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी शंकराचे दर्शन घेतले तसेच तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार व ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचे अनावरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मित्राचे उपाध्यक्ष व तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष आणि पोलीस अधीक्षक संजय जाधव हे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली तसेच मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची पाहणी करून उपस्थितांशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार व ऐतिहासिक कलाकृतीचे अनावरण हे राज्यासाठी अभिमानाचे ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे तुळजापूरच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.