तेर, धाराशिव :-
वारकरी संप्रदायात प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या समाधीमंदिर परिसराला आता नवी झळाळी मिळणार आहे. संत गोरोबाकाका मंदिर व परिसराच्या विकास आराखड्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून, समाधीमंदिर परिसरात भव्य महाद्वार उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाच्या लौकिकाला साजेसे हे महाद्वार भाविकांना मोठा आत्मिक आनंद देईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते नुकतेच या भव्य महाद्वाराच्या कामाचे भूमीजन करण्यात आले. याबरोबरच तेर आणि परिसरात आणखी काही विकासकामे सुरू आहेत. आराखड्यातील उर्वरित कामेही येणाऱ्या काळात लवकरच सुरू होतील. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्राचीन तेर नगरीच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले आहे. वारकरी संप्रदायात संतश्रेष्ठ म्हणून गोरोबा काका यांच्या नावाची ख्याती आहे. तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या नगरीत श्री संत गोरोबाकाका यांचे प्राचीन समाधी मंदिर आहे. या मंदिर परिसरातील महाद्वाराचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या समाधी मंदिरात दर एकादशीला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. चैत्र महिन्यातील वार्षिक यात्रोत्सव या परिसरातील नागरिकांचे आकर्षन असते. त्याचबरोबर तेर नगरीत असलेल्या अनेक प्राचीन वास्तूंमुळे देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक आणि पर्यटकांचीदेखील सतत वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन आपण मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करण्यात केला. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात विकासकामांसाठी १३ कोटी निधी उपलब्ध झाला असून, त्यातून महाद्वार, नगारखाना, संरक्षक भिंत, शौचालय, दर्शनबारी, भक्तनिवासाचे उर्वरित काम, छोट्या व्यावसायिकांसाठी दुकाने, विद्युतीकरण आदी कामे केली हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संत गोरोबाकाका मंदिराच्या महाद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. यावेळी पद्माकर फंड, नवनाथ नाईकवाडी, जुनेद मोमीन, बालाजी पांढरे, विलास रसाळ, सुभाष कुलकर्णी, सतीश कदम, भूजंग खांडेकर, प्रजोत रसाळ, गणेश फंड, तानाजी बंडे, रजनीकांत पेठे, बिभीषण लोमटे, मज्जित मणियार, ग्रा. पं. सदस्य अजित कदम, नवनाथ पसारे, प्रवीण साळुंखे आदी उपस्थित होते
तेरला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र करण्यासाठी प्रयत्न
सध्या तेर येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आपण मोठा पाठपुरावा करून १३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्राचीन तीर्थकुंडासाठी ५ कोटी ११ लाख, बौद्ध स्तूप विकसित करण्यासाठी २ कोटी २१ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. राज्यातील सर्वात पुरातन मंदिर अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराचे रु.२ कोटी ९० लाख निधीतून जतन आणि संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. प्राचीन वास्तू आणि मंदिरांना गतवैभव मिळत आहे. एक व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या प्रयत्नांना येत असलेला आकार आत्मिक समाधान देणारा आहे. हजारो वर्षापासून तेरच्या भूमीवरुन एक समृद्ध नागरी वस्तीची साक्ष पटेल अशी अनेक अभिमानस्थळे आजही याठिकाणी पहायला मिळतात. दोन हजार वर्षाचा हा वारसा अनुभवता यावा यासाठी तेरला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.