जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
धाराशिव प्रतिनिधी :- (दि.१८,)
ग्राहकांची कर्तव्ये,हक्क व जबाबदाऱ्याबाबत जनजागृती करण्याचे काम जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने होत आहे.विविध घटकांचा समावेश करुन ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला आहे.ग्राहक संरक्षण कायदयामुळेच ग्राहकाला जलदगतीने न्याय मिळण्यास मदत झाली आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने आज १८ मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त नियोजन भवनातील सभागृहात आयोजित ग्राहक जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष श्रीमती प्रज्ञा हेंदरे,प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्री.पूजार व श्रीमती हेंदरे यांनी नियोजन भवन परिसरात जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन आयोजित ग्राहक जनजागृती प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन केले.या प्रदर्शनात तहसिल कार्यालय,धाराशिव यांचा रेशनकार्ड ई-केवायसी करणेबाबत,अन्न व औषध प्रशासन विभाग,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,दुग्ध विकास अधिकारी, वैधमापनशास्त्र विभाग एलआयसी, उमेदच्या बचतगटांचे स्टॉल,गॅस एजन्सी आणि सेंद्रिय निविष्ठा निर्मिती व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री.पूजार मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की,ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून ग्राहकाला न्याय देण्याचे काम होत आहे.ग्राहक संरक्षण कायदयाअंतर्गत विविध सेवा येतात.ग्राहकाने केलेल्या तक्रारीवरुन त्याला न्याय देण्याचे काम या कायदयामुळे होत आहे.ग्राहक संरक्षण कायदयाबाबत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. तसेच तालुकास्तरावर ग्राहक जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती हेंदरे म्हणाल्या की,पैसे देवून कोणतीही सेवा घेतली असेल तर घेणारा हा ग्राहक आहे.सदोष सेवा मिळाली तर सेवा देणाऱ्याविरुध्द ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.या कायदयामुळे सुरक्षिततेचा हक्क,ग्राहक जनजागृती अधिकार मिळाला आहे.विद्यार्थ्यांनी ग्राहक कायदयाचे वाचन केले पाहिजे.त्यानुसार आपण ग्राहक म्हणून जागरुक असलो पाहिजे.शाश्वत जीवन शैलीसाठी पर्यावरणापुरक वस्तुची खरेदी केली पाहिजे.तरच आपण समृध्द जीवन जगू शकतो असे त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी मेडा लातूरच्या श्रीमती वैशाली ठोंबरे यांनी पीएम कुसुम योजनेची माहिती दिली.शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या या योजनेविषयी विस्तृत माहिती देवून जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दिवसा सिंचनासाठी सौर कृषी पंपासाठी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
वीज वितरण कंपनीचे एन.आर.देशमुख यांनी पी.एम.सुर्यघर योजनेची माहिती देतांना सांगितले की,पारंपारीक उर्जेचे स्त्रोत हे खर्चिक व पर्यावरणाला हानी पोहचविणारे आहे.कोळशातून मोठया प्रमाणात वीज निर्मिती होत असतांना दुसरीकडे प्रदुषणात वाढ होते.सन २०२५ चा विचार केल्यास कोळसा हा संपणार आहे.अपारंपारीक उर्जेकडे आपण वळत आहोत.सौर उर्जा ही न संपणारी आहे.आज जे इंधन म्हणून आपण कोळसा,गॅस, आईलचा वापर करतो,हे उर्जेचे स्त्रोत पर्यावरणाला हानी पोहचवित आहे. पी.एम.सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सौर उर्जेची निर्मिती आपण घरीच करुन आपली वीजेची गरज भागवू शकतो.सौर उर्जेमुळे पर्यावरणाला हानी पोहचत नाही.त्यामुळे जास्तीत जास्त कुटुंबांनी पी.एम.सुर्यघर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य अजित बगाडे व अशोक घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शरद वडगावकर,अजित बगाडे,सचिन कवडे, आशिष पाथरकर,संतोष केंद्रे,अंकुश उबाळे,अनिल पाटील,दिलीप पाटील, गजानन कुलकर्णी,रविशंकर पिसे यांच्यासह अन्य जिल्हा ग्राहक परिषदेच्या अशासकीय सदस्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती स्वाती शेंडे यांनी केले.संचालन धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव यांनी,उपस्थितांचे आभार सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे यांनी मानले.यावेळी ग्राहक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते,विविध विभागाचे अधिकारी – कर्मचारी,स्वस्त धान्य दुकानदार,नागरिक तसेच विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****



                                    
