मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलले
उमरगा -प्रतिनिधी
मराठी भक्तीपरंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेले, जगाला शांती, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांनी संसारातील सर्व सुख-दुःखे परखडपणे अनुभवत आपली वृत्ती विठ्ठलचरणी स्थिर केली. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. भागवतधर्म मंदिराचा कळस असलेले असे हे संत तुकाराम महाराज…!
आपल्या भक्तीबळावर ‘आकाशाएवढ्या’ झालेल्या संत तुकारामांनी वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी सदेह वैकुंठगमन केले. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला, यावेळी ह.भ. प. गुलाब पांचाळ महाराज यांचे गुलालाचे कीर्तन झाले, यावेळी हनुमान भजनी मंडळ, यांच्यासह परिसरातील भजनी मंडळ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, तुकाराम बीजे निमित्त ग्रामदैवत मारुती मंदिरात झेंडूच्या फुलाची भव्य अशी आरास करण्यात आली होती,
तसेच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता,
गुलालाची कीर्तन झाल्यानंतर दुपारी ठीक बारा वाजून दोन मिनिटांनी गुलाल उधळून फुले टाकण्यात आली, यावेळी मंदिर परिसर हरीनामाच्या गजरात दुमदुमून गेले होते.
तुकाराम बीज उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी मारुती देवस्थान कमिटी, हनुमान भजनिक मंडळ गावातील ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.