संभाव्य पाणी व चारा टंचाई आढावा बैठक
धाराशिव दि.१ मार्च (जिमाका) या वर्षातील संभाव्य पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
२८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाई संदर्भात आयोजित आढावा बैठकीत श्री.पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पी.आर.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खंडेराव सराफ,जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस एम कुलकर्णी,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.आवटे,कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी एम.एम.नाईक व जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या श्रीमती एम.आर. डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.तर दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी, नगरपालिका/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
श्री.पूजार पुढे म्हणाले की,ज्या विहिरींमध्ये गाळ आहे,तो गाळ काढण्याचे काम तसेच नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरी दुरुस्तीची काम तातडीने हाती घ्यावी.संबंधित यंत्रणांनी एकत्र बसून भूजल पातळीत तसेच पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात.पाणीटंचाईच्या काळात तालुका यंत्रणांनी योग्य समन्वयातून टंचाई भासू शकणाऱ्या गावात आवश्यक त्या उपाययोजना तयार कराव्यात तसेच यावर्षी वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबवावी.रोपे तयार करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रोपवाटिका तयार करण्यात याव्यात असे त्यांनी सांगितले.
पाण्याशी संबंधित असलेल्या यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी,असे सांगून श्री.पूजार म्हणाले की,जल जीवन मिशनची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत.ग्रामस्थांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे,असे ते म्हणाले.
डॉ.श्री.घोष म्हणाले की,मागील वर्षी ज्या गावांमध्ये पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, त्या गावात आतापासूनच दक्षता घ्यावी. नादुरुस्त हातपंप दुरुस्त करून घ्यावे. गाळाने भरलेल्या विहिरीतील गाळ काढण्यात यावा.तालुका यंत्रणांनी पाणीटंचाईचे प्रस्ताव काळजीपूर्वक बघावे,ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे, त्या गावात जाणाऱ्या टँकरची पाणी घेऊन जाण्याची क्षमता बघावी व तो वेळेत गावात पोहचेल याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.
सन २०२४ मध्ये जिल्ह्यात एकूण सरासरी १२० टक्के पाऊस झाला असून सीना कोळेगाव या मोठ्या प्रकल्पात सध्या ५७ टक्के,१७ मध्यम प्रकल्पात ५२ टक्के आणि २०८ लघु प्रकल्प ४० टक्के असा एकूण ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.मागील वर्षी जिल्ह्यात १०३ गावात १५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.५०० गावात ८५४ विहीरी व विंधन विहिरी अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती श्री.सरवदे यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात १ एप्रिल ते ३१ जून २०२५ चा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून ९ विविध प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. ग्रामीण भागासाठी १३४८ उपाययोजना ४८७ गाव/वाड्या व वस्त्यांसाठी प्रस्तावित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
२० व्या पशु गणनेनुसार जिल्ह्यात ७ लक्ष ९० हजार ३९९ पशुधन असून प्रतिदिन या पशूसाठी ३०८९ मॅट्रिक टन इतक्या वैरणाची आवश्यकता असल्याची माहिती डॉ.पुजारी यांनी यावेळी दिली.तसेच संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती यावेळी दिली.