जळकोट, दि.२२(मेघराज किलजे):-
येथून जवळच असलेल्या पांढरी या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी व जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मणराव कारले यांना अहमदपूर (जि. लातूर) येथील दुसऱ्या राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील आरोग्य सेवेतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल आरोग्य सेवेतील पहिला कर्मवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अहमदपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ ,नांदेड व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनात डॉ.लक्ष्मणराव कारले यांना लातूरचे भाजपा अध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. कारले यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. घरच्या आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातून दोन पदविका मिळवल्या आहेत. रुग्णसेवेत झोपून देणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. धाराशिव, लातूर व पुणे येथील ससुन रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबर त्यांनी सामाजिक कार्यात सतत हातभार लावत आहेत. डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांना आतापर्यंत अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, दिलीप देशमुख, प्राचार्य डॉ. माधवराव गाडेकर, संमेलन अध्यक्ष , ज्येष्ठ साहित्यिक, कवी विलासराव सिंदगीकर , रामभाऊ गुडिले आदि साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होती. या संमेलनाचे आयोजक ॲड. भानुदास कलवले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. डॉ. लक्ष्मणराव कारले यांचे सर्व स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.