spot_img
12.6 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पाटील गुरुजींच्या मळ्यात हुरडा पार्टीचा लुटला रोटरी सदस्यांनी आनंद…..

 

मुरूम, ता. उमरगा, ता. २१ (प्रतिनिधी) : –

हुरडा पार्टी एक अनोखा व पारंपारिक ग्रामीण भागातील हिवाळ्यातील विशेषतः जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. हा एक आगळा-वेगळा खाद्यसंस्कृतीचा उत्सव मानला जातो. ताज्या-कोवळ्या ज्वारीच्या कणसांना उष्ण राखेत भाजून हाताने रगडून काढलेल्या गरम दाण्यांचा हुरडा म्हणजे हुरडा पार्टी होय. बिराजदार वस्ती, ता. उमरगा येथील रोटरीयन कलाप्पा पाटील गुरुजी यांच्या शेतातील मळ्यात शनिवारी (ता. २१) रोजी ताज्या ज्वारीच्या कुरकुरीत आणि चवदार दाणेदार हुरडा, शुद्ध निसर्गरम्य ग्रामीण वातावरणातील आनंददायी मेजवानीची पर्वणीच होती. गूळ, पेंडखजूर, खारे शेंगदाणे, चिवडा, मीठ, चटणीसोबत कवळ्या दाणेदार चविष्ट हुरड्याचा आस्वाद मुरूम रोटरीच्या सदस्यांनी घेतला. याप्रसंगी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, संतोष कांबळे, उपप्राचार्य कलाप्पा स्वामी, प्रकाश रोडगे, शिवकुमार स्वामी, प्रा. भूषण पाताळे, मल्लिनाथ बदोले आदींनी हिवाळा स्पेशल हुरडा पार्टीचा आनंद लुटला. शेतसंध्येप्रसंगी ढाळे, गावाकडच्या मातीचा सुगंध, गावरान उसाचा रस, हुरडा पार्टी ही केवळ खाण्याचा आनंद घेण्याची संधी नसून, ग्रामीण संस्कृतीशी जोडले जाण्याचा एक खास आनंद उत्सव आहे. ओम मुळे, नरसप्पा पाटील, साई मुळे, मल्लिनाथ पाटील, महादेव मुळे आदींनी पुढाकार घेऊन स्पेशल हुरडा पार्टीचे नियोजन केले. शेवटी हुरडा पार्टीचा समारोप करताना कलाप्पा पाटील यांनी हुरडा पार्टी……
थंडीच्या या गार वाऱ्यात,
मैत्रीचा रंग फुलला खास,
शेतामधल्या हिरव्या गाली,
हुरड्याचा दरवळला सुवास !
धगधगत्या या निखाऱ्यावर,
हुरडा झाला भाजून गडद,
चटणी, लसणीची चव खमंग,
गरम हुरड्याचा गोड स्वाद !
उसाच्या रसाची गोड सरिता,
भाकरीचा तो खरपूस तुकडा,
खेड्याच्या माळरानावरती,
धमाल आली गप्पांची नुकती !
संगती असता स्नेहभाव,
हुरडा पार्टी रंगत जाते,
निसर्गाच्या कुशीत सारे,
आठवणींचे मोती लुटते !
या कवितेतून आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. फोटो ओळ : बिराजदार वस्ती, ता. उमरगा कलाप्पा पाटील यांच्या मळ्यात रोटरीच्या सदस्यांनी हुरडा पार्टीचा आनंद घेताना……

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या