धाराशिव – जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणाच्या दिशेने पाऊल उचलण्यात येत असून, विविध आरोग्य संस्थांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अंतर्गत उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य युनिट्स आणि जिल्हा औषध भांडार यांसह आरोग्य यंत्रणेच्या विस्तारास चालना मिळणार आहे.
नळदुर्गच्या ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय हे २१ कोटी ८२ लक्ष रुपये खर्च करून पूर्णत्वास आले आहे. या प्रकल्पात अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये सुसज्ज मुख्य इमारत, बाह्य व आंतररुग्ण विभाग, प्रसूती गृह, शस्त्रक्रिया विभाग, ऑक्सिजन पुरवठा विभाग, शवविच्छेदन विभाग, औषध भांडारगृह व नातेवाईकांसाठी धर्मशाळेचा समावेश आहे.
बेंबळी येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय हे ४ कोटी ५० लाख रुपये खर्च करून तयार झाले आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या असून, प्रसूती गृह, शस्त्रक्रिया विभाग व दिव्यांगांसाठी विशेष सोयींचा समावेश आहे.