धाराशिव / प्रतिनिधी :-
धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी शिवारात अवैध गांज्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर शिराढोण पोलिसांनी धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत तब्बल 347 किलो 280 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे. या मुद्देमालाची बाजारातील किंमत 27.78 लाख रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कसा उघड झाला प्रकार?
दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी शिराढोण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांना खबर मिळाली की, खामसवाडी (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात मोठ्या प्रमाणावर अवैध गांज्याची लागवड करून त्याचे संवर्धन केले आहे. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले.
पोलीस कारवाई आणि मोठा सापळा!
शासकीय पंच व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी खामसवाडीतील गट क्रमांक 119 व 121 येथे छापा टाकला असता, संभाजी ऊर्फ बंडू भीमराव हिलकुटे (वय 54, रा. खामसवाडी) यांनी स्वतःच्या आणि वडिलांच्या नावावरील शेतात मोठ्या प्रमाणावर गांज्याची झाडे लावून त्यांचे संगोपन करत असल्याचे आढळले.
तपासादरम्यान पोलीस पथकाला शेतातून एकूण 347 किलो 280 ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे सापडली, ज्याची एकूण बाजारभावानुसार किंमत 27,78,240 रुपये आहे. लगेचच पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून शेतकऱ्यावर एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या अधिकाऱ्यांनी केली मोठी कारवाई!
या धडक कारवाईत कळंब पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवि सानप, शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कल्याण नेहरकर, तसेच पो.उ.नि. चोपणे, तांबडे, पोहेकॉ. राठोड, पोकॉ. मनोज मरलापल्ले, लाकाळ, कांबळे, गायकवाड, शेख, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंबचे पोकॉ. करीम शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गांजाच्या अवैध शेतीमुळे जिल्ह्यात खळबळ!
धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांज्याची लागवड उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध ड्रग्ज व्यवसायावर वचक बसणार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले आहे.



                                    
