मुंबई (दि.14) : –
तुळजापुरच्या आई भवानी माता मंदिर जिर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि परिसराचा विकास, आणि मराठी चित्रपटांसाठी एक पडदा चित्रपटगृहे उपलब्ध करुन देणे, या तिन्ही विषयाच्या आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात बैठका झाल्या. या तिन्ही विषयांत पुढील पंधरा दिवसांत स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय झाला.
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरातत्व विभागामार्फत तुळजापुरच्या भवानी मातेचे मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती मंत्री ॲड. शेलार यांनी दिली. सोमवारी हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या परिसरात सध्या दोन एजन्सी मंदिर दुरुस्ती आणि डागडुजीचे काम करीत आहेत. या दोन एजन्सींमध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम घेण्याबाबत मंत्री ॲड.शेलार यांनी विभागाला निर्देश दिले.
मंदिराचा कळस ज्या खांबावर उभा आहे त्या खांबाना तडे गेले आहेत. त्यामुळे मंदिरांच्या मुख्य गर्भगृहाचे काम करावे लागले तर आई भवानी मातेची मुर्ती व तीच्या दैनंदिन याबाबत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, मंदिराचे पुजारी, स्थानिक, मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी बैठक घेऊन शासनाला उपाय सूचवा , असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.
मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. याबैठकीस स्थानिक प्रतिनिधी म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
रायगड विकास प्राधिकरणातर्फे ६०० कोटीचा कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मंत्री ॲड. शेलार यांना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामार्फत रायगड किल्ला आणि रायगड परिसराचा विकास करण्यात येणार असून या कृती आराखड्यासंबंधित सादरीकरण तयार करण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करुन लवकरच रायगड प्राधिकरण, स्थानिक कलेक्टर, केंद्रिय पुरातत्व विभागाचे अधिकारी, राज्यशासनाचा पुरातत्व विभाग अशी संयुक्त बैठक घेण्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.