जळकोट / प्रतिनिधी :- दि.१४(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावातील सर्व हॉटेलमध्ये कागदी कपात चहा देण्याचे बंद होणार आहे. ग्रामसभेमध्ये घेतलेल्या ठरावाची दि.१मार्च २५ पासून अंमलबजावणी करण्यासाठी सर्व हॉटेल व्यावसायिक यांना ग्रामपंचायत कार्यालयाने नोटीस काढली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना यापुढे चिनीमाती, काच किंवा स्टीलची कप – बशी ठेवावी लागणार आहे.
कॅन्सर सारख्या धोकादायक रोगाला आमंत्रण देणाऱ्या कागदी कपाचा वापर सर्रास होत होता. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. हि बाब लक्षात घेऊन जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामसभेत काही नागरिकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. दि.२९ जानेवारी २०२५ च्या ग्रामसभेत आवाजी मतदानाने कागदी कपात चहा विक्री करण्यास बंदी घालण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. सरपंच गजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव संजय रेणुके यांनी मांडला होता. तर या ठरावास मेघराज किलजे यांनी अनुमोदन दिले होते. ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी प्रत्यक्षात येण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामसभेच्या ठरावा आधारे गावातील सर्व हॉटेल्स व्यावसायिक मालकांना नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये म्हटले आहे की, जळकोट गावातील व जळकोट कार्यक्षेत्रातील सर्व चहा, कॉफी, दूध, बुस्ट इ. गरम पेये विक्रेते, हॉटेल, चहाच्या टपरी व उपरोक्त ठरावानुसार अवगत करण्यात येते की, सर्व चहा विक्रेत्यांनी चहा, कॉफी, दूध व बुस्ट हि गरम पेये ग्राहकांना देत असताना कागदी कपाचा वापर करू नये. कारण सदर कागदी कपात पेय पिल्याने मानवास कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व चहा, कॉफी, दूध व बुस्ट इ. गरम पेये विक्रेते , हॉटेल चालक, टपरी चालक विनंती करण्यात येते की, त्यांनी कागदी कपाचा वापर करण्याचे टाळावे. कागदी कपाऐवजी पारंपारिक चिनी मातीची कप बशी , स्टीलचे किंवा काचेचे ग्लास अशा साधनातून गरम पेय द्यावेत. दि.१मार्च २०२५ पासून अगदी कपाचा वापर केल्याचे दिसून आल्यास त्यांना नियमाचे उल्लंघन केले म्हणून ५०० रु. दंड आकारण्यात येईल. असे लेखी दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे. जळकोट गावात यापुढे कागदी कपातील चहा देणे. बंद होणार आहे.