तुळजापूर प्रतिनिधी (दि. २८ ) :-
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज, रविवार (दि. २८ डिसेंबर २०२५) पासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. ‘आई राजा उदो उदो’ आणि ‘शाकंभरी देवीचा उदो उदो’ अशा जयघोषात, संबळाच्या कडकडाटात दुपारी १२ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील गणेश विहार ओवरीत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.
पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना
शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पहाटे ३ वाजता देवीला मोहनिद्रेतून उठवून भोपे पुजारी यांच्या हस्ते पुनश्च सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आले. यानंतर धार्मिक विधींना सुरुवात झाली. शाकंभरी नवरात्र महोत्सव हा आज दि. २८/१२/२०२५ पासून सुरू झाला असून तो ३ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. १६ आणे भोपे पुजारी वर्गाकडून अनादी काळापासून हा उत्सव परंपरेनुसार साजरा केला जातो.
शाकंभरी देवीचे महत्त्व
पुराणकाळात पृथ्वीवर पडलेल्या भीषण दुष्काळातून जगाला वाचवण्यासाठी देवीने ‘अन्नपूर्णा’ म्हणजेच शाकंभरी देवीचा अवतार घेतला होता. ‘शाक’ म्हणजे पालेभाजी आणि ‘भरी’ म्हणजे भरण-पोषण करणारी. या देवीने दुर्गम नावाच्या दैत्याचा वध करून ब्रह्माकडून पळवून नेलेले चारी वेद परत मिळवून दिले होते. भारतात कर्नाटक (बदामी), राजस्थान (उदयपूर वाडी) आणि उत्तर प्रदेश (सहारनपूर) येथे शाकंभरी मातेची प्रसिद्ध मंदिरे आहेत.
विविध सेवाधारी मंडळींची उपस्थिती
आजच्या घटस्थापना विधीवेळी मुख्य यजमान उपाध्ये पुजारी यांच्यासह भोपे पुजारी सुधीर कदम, अतुल मलबा, आण्णासाहेब सोंजी, बळवंत कदम, सचिन कदम, प्रशांत सोंजी, बापू सोंजी, सचिन पाटील, शशीकांत कदम, स्वराज कदम, संजय मामा कदम, समाधान कदम, दिनेश कदम, प्रमोद कदम, रोहित कदम, गणेश कदम, शिवाजी कदम, चेतन मलबा, राजाभाऊ मलबा, सार्थक मलबा, अविराज मलबा, पृथ्वी मलबा, अक्षय कदम, नागेश कदम, संकेत पाटील, जगदीश पाटील, प्रशांत पाटील, धनू पाटील, प्रसाद पाटील, तुषार कदम, अनुप उदाजी, सुहास भैय्ये, युवराज भैय्ये यांच्यासह गोंधळी, छत्रे, चोपदार, पवेकर आणि इतर सेवाधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
पुढील सात दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.




