धाराशिव प्रतिनिधी :-
वाशी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथलगिरी येथील जैन मंदिरात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटीतील तब्बल १२ लाखांपर्यंतची रोकड व पितळी मूर्ती चोरून नेल्या. ही घटना १६ ते १७ ऑक्टोबरच्या रात्री घडली.
याप्रकरणी उमंग रविंद्र शहा (वय ४५ वर्षे, रा. कुंथलगiri, ता. भुम) यांनी १७ ऑक्टोबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मेन गेटचा कडी-कोंडा तोडला. आत प्रवेश करून त्यांनी दानपेटी फोडली आणि त्यातील अंदाजे ९ लाख ते १२ लाख रुपयांची रोख रक्कम व देव-देवतांच्या पितळी मूर्ती (एकूण अंदाजे किंमत १२ लाख १० हजार ५०० रुपये) लंपास केल्या.
उमंग शहा यांच्या तक्रारीवरून, वाशी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) आणि ३०५ (डी) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.




