spot_img
9.3 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न ‘डीपीसी’च्या बैठकीत ठराव : आमदार राणाजगजितसिंह पाटील

 

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान अभुतपूर्व आहे. त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीचा पीकविमा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील एकूण शेतकरी बांधवांपैकी सुमारे ३० टक्के बांधवांनी पीकविमा हफ्ता भरला नसल्याची आकडेवारी आहे. ज्यांनी पीकविमा भरलेला नाही अशा शेतकरी बांधवांनाही मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे पीकविमा न भरलेला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळायला हवा, यासाठी बुधवारी आपण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव मांडला. त्याला मान्यताही देण्यात आली असून हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एकूण ७३३ गावांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात धाराशिव तालुक्यातील सर्वाधिक १२५ गावांचे त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील १२२, भूम, परंडा आणि उमरगा तालुक्यातील ९६, लोहारा तालुक्यातील ४७, कळंब तालुक्यात ९७ तर वाशी तालुक्यातील बाधित गावांची संख्या ५४ इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण सहा लाख ३९ हजार ९२७ शेतकरी बांधवांच्या वाट्याला या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान आले आहे. जिल्ह्यात पाच लाख ३४ हजार ३८२ हेक्टरहुन अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. यात पाच लाख ५४३२ हेक्टर जिराईत, २२ हजार ६११ हेक्टर बागायत तर सहा हजार ६३९ हेक्टर क्षेत्र फळपिकांचे आहे. बाधित असलेल्या संपूर्ण क्षेत्राचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण नुकसानीची तीव्रता अभूतपूर्व अशीच आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ६८३ विहिरी खचल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

पशुधन दगावले आहे, घरांची पडझड झाली आहे. शेतातील ड्रीपसेट, पंपसेटही पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले आहेत. पिकांचा चिखल झाला आहे. घरात साठवलेल्या धान्याचीही नासाडी झाली आहे. मिळणारे अनुदान, विविध प्रकारची मदत आणि पीकविमा या सर्व बाबींचा मेळ घातला तरीही अनेकांचे नुकसान भरून निघणार नाही. त्यासाठी काही विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. जेणेकरून बाधित शेतकरी बांधवांना अधिकाधिक दिलासा मिळू शकेल. जिल्ह्यातील बाधित असलेल्या एकूण सहा लाख ३९ हजार ९२७ शेतकरी बांधवांपैकी सुमारे ३० टक्के शेतकरी बांधवांनी यंदा पीकविमाच भरला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ज्यांनी पीकविमा भरला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळावा यासाठी आपले महायुती सरकार अत्यंत संवेदनशीलपणे विचार करीत आहे. पुढील टप्प्यात ज्यांनी पीकविमा भरलेला नाही मात्र ज्यांचे नुकसान मोठे आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनाही राज्य सरकारकडून भरीव नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसा ठराव मांडला. त्याला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा ठराव आपण राज्य सरकारकडे पाठवणार आहोत. सरकार गांभीर्याने पीक विमा न भरलेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्याचा विचार करीत आहेच. त्याव्यतिरिक्त क्राऊड फंडिंगच्या माध्यमातूनही ज्यांच्या नुकसानीची व्याप्ती खूप अधिक आहे त्या सर्व शेतकरी बांधवांचे नुकसान भरून काढण्यासाठीही आपण प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे ज्यांनी पीकविमा भरलेला नाही मात्र त्यांचे नुकसान मोठे आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना खचून जाऊ नये आपले महायुती सरकार ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

 

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या