तुळजापूर प्रतिनिधी :-
स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आज दि.१४ आक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी शेतकऱ्यांसाठी घातले साकडे.यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करत नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आईच्या चरणी कळकळीची प्रार्थना केली. त्या म्हणाल्या, “या कठीण काळात आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आर्थिक आणि मानसिक आधार बनून उभे राहिले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांनीही खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागावे.”
आई तुळजाभवानीकडे साकडे घालताना त्या भावूक झाल्या. त्यांनी प्रार्थना केली की, “आई, माझ्या बळीराजावर पुन्हा अशी पूरस्थिती येऊ देऊ नकोस. हे सर्व शेतकरी तुझीच लेकरं आहेत, त्यांच्या दुःखाचा अंत कर आणि त्यांना या महासंकटातून बाहेर पडण्याची शक्ती दे.”
यावेळी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर संस्थानच्या वतीने भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, तसेच त्यांचे कौटुंबिक स्नेही रोहित पडवळ, आकाश मुंडे, श्रीनाथ पडवळ, किरण शेटे, आणि जनसंपर्क अधिकारी देशपांडे यांनी प्राजक्ता गायकवाड यांचे स्वागत केले. त्यांना देवीचे प्रसादरूप वस्त्र आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
“शेतकरी हेच या मातीतले खरे नायक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, हीच माझी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



                                    
