धाराशी न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
शेतकऱ्यांना द्यावयाच्या पिक विम्याच्या भरपाईसाठी जळकोट मंडळात सोयाबीन पिकाच्या दरडोई उत्पन्न आधारित अंदाज काढण्यासाठी जळकोट मंडळाचा सोयाबीन पिकाचे पीक कापणी प्रयोग घेण्यात आला.
जळकोट मंडळात यावर्षी पावसाने थैमान घातला होता. मान्सूनपर्व पावसाने परिसराला झोडपले होते. अशातच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. यावर्षी पावसाने हाहाकार माजवल्याने संपूर्ण सोयाबीन पीक पाण्यात होते. पिकाचे उत्पन्न घटणार निश्चित होते. पेरणी, काढणी खर्चही शेतकऱ्याच्या पदरात पडणार नाही. अशी परिस्थिती सध्या आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात पीक नुकसान भरपाईसाठी पिक विमा भरला आहे. परंतु वैयक्तिक नुकसान भरपाई यावर्षीपासून मिळणार नाही. पीक विम्याचे मदतीचे निकष बदलून मंडळ आधारित पिक विमा भरपाई अवलंबून असल्याने पीक कापणी प्रयोगाला विशेष महत्त्व आले आहे. सध्या विविध मंडळात पीक कापणी प्रयोग सुरू आहेत.
जळकोट मंडळ अंतर्गत असलेल्या विविध गावातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी सोयाबीन पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज काढण्याचा प्रयोग घेण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी मार्ग मोकळे झाले आहेत. जळकोट येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतावर एक कापरी प्रयोग घेण्यात आले. यात जळकोटवाडी (नळ)येथील महिला शेतकरी सुलाबाई लहू कदम यांच्या गट नंबर २१५ मधील तर जळकोट येथील शेतकरी कै. बंकटराव विठोबा कदम यांच्या गट नंबर ८३२ मधील १० बाय ५ मीटर अंतरातील काढणी ,मळणी करुन सरासरी उत्पन्न काढण्यात आले. यात गट नंबर २१५ मध्ये सोयाबीन या पिकाचे उत्पन्न १ किलो ८०० ग्रॅम ८५ मिलिग्रॅम निघाले तर गट नंबर ८३२ मध्ये सोयाबीन या पिकाचे उत्पादन १ किलो ४०० ग्रॅम ६५ मिलिग्रॅम निघाले. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. सततच्या पावसामुळे उत्पन्न घटल्यामुळे मंडळ आधारित पिक अंदाज प्रयोग यशस्वी झाले आहे. या अंदाजावरच जळकोट मंडळातील शेतकऱ्यांना पिक विम्याची भरपाई मिळणार आहे. ती कापणी प्रयोगावेळी प्रत्यक्ष दर्शनी जळकोटचे सरपंच गजेंद्र कदम, शेतकरी प्रतिनिधी महेश कदम, विस्तार अधिकारी नडगिरे , ग्रामविकास अधिकारी देवानंद रेड्डी, शेतकरी प्रतिनिधी सुलाबाई कदम, विमा कंपनीचे प्रतिनिधी ए. एन.मुळे, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.




