- धाराशिव प्रतिनिधी :-
सोमनाथ गुरव यांनी “आमच्या आंदोलनामुळे शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे उजळले” असा हास्यास्पद दावा केला आहे. वास्तव हे आहे की, या कामासाठी निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला, आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला.असं असताना गुरव यांनी आंदोलनाचं श्रेय घेणं म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा अयशस्वी प्रयत्नच! असा आरोप भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी केला आहे.
धाराशिव नगरपालिकेवर गेल्या पाच वर्षांत तुमचाच ताबा होता, नगराध्यक्ष तुमचे, आमदार तुमचे, खासदार तुमचे. तरीसुद्धा शहरात शेकडो भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली. कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च व्हायचा होता, पण तो कोणाच्या खिशात गेला हे धाराशिवकरांना चांगलं ठाऊक आहे. जर खरंच तुम्हाला जनतेचा इतका कळवळा होता, तर त्या भ्रष्टाचाराच्या काळात तुम्ही आंदोलन का केलं नाही..?
शहरात मुबलक पाणी असूनही नागरिकांना १५-१५ दिवस पाण्यासाठी तडजोड करावी लागली, रस्त्यांची अवस्था एवढी बिकट झाली की एकेकाळी चांगल्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध धाराशिव आज खड्ड्यांसाठी कुप्रसिद्ध झालं आहे.
आता फेसबुकवर पोस्ट टाकून आणि काम मंजूर झालं, पूर्णत्वास चालले की आंदोलनाचा फार्स करून खोट्या आंदोलनांच्या नौटंकीतून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न बंद करा. धाराशिवकरांना तुमची नाटके, तुमच्या ढोंगी घोषणा आणि तुमचा कारभार ओळखला आहे. शहराच्या विकासाऐवजी दुर्दशा करणाऱ्यांना जनता येत्या निवडणुकीत योग्य उत्तर देईल आणि तुमचा सुपडा साफ होणार, हे नक्की! असेही भाजपा शहराध्यक्ष शिंदे यांनी उबाठाचे माजी नगरसेवक गुरव यांना उद्देशून म्हंटले आहे.




