spot_img
12.9 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

कुलस्वामिनीच्या तुळजापुरनगरीत भक्तिभावाच्या वातावरणात घटस्थापना ; नवरात्र महोत्सवास उत्साहात सुरुवात

 

 

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५

 

तुळजापूर / प्रतिनिधी :- (दि.२२ सप्टेंबर)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज सोमवार, आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरुवात झाली.पहाटे पारंपरिक विधीनुसार देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.

 

दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते मंत्रोच्चार,पारंपरिक वाद्यांचा गजर आणि “आई राजा उदो-उदो” च्या घोषणांत घटस्थापना विधी पार पडला.

 

भाविकांची गर्दी

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र तुळजापूरनगरीत महाराष्ट्रासह कर्नाटक,तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून हजारो भाविक दाखल झाले आहेत.पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविकांनी उपस्थिती दर्शवली.भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन,पोलीस, नगरपरिषद,महसूल,आरोग्य, पाणीपुरवठा,सार्वजनिक बांधकाम व राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रे,स्वच्छता,पिण्याचे पाणी आणि वाहतुकीवर विशेष लक्ष दिले जात आहे.

 

मान्यवरांची उपस्थिती

घटस्थापना सोहळ्यास आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, सौ.सौमय्याश्री पुजार,जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील,मंदिर संस्थानच्या तहसीलदार व व्यवस्थापक माया माने,पुजारी विनोद सोंजी (कदम), महंत तुकोजी बुवा,महंत चिलोजी बुवा,महंत बजाजी बुवा,महंत हमरोजी बुवा,महंत वाकोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,विपिन शिंदे,अनंत कोंडो आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

 

घटस्थापनेचे धार्मिक महत्व

सिंहाच्या गाभाऱ्यात देवींजींच्या डाव्या बाजूला घट बसवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या जमिनीतील ‘वावरी’ माती घटस्थापनेसाठी आणली जाते. परंपरेनुसार तुळजापूरातील धाकटे कुंभार कुटुंबीयांकडून घट कलश येतो,ज्यात गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पाणी भरलेले असते.तसेच शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्य अर्पण केले जाते.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते घट प्रतिष्ठापित केला जातो आणि देवीची पहिली माळ (नागवेलीच्या पानांची) अर्पण केली जाते.

 

नवरात्र उत्सवाचे स्वरूप

पुढील नऊ दिवस तुळजापूरनगरीत भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.धार्मिक विधींबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,हा उत्सव अध्यात्म,श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम ठरणार आहे.

 

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या