तुळजापूर बसस्थानकांना नवे नाव – श्री तुळजाभवानी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ नामकरण
धाराशिव / प्रतिनिधी :- (दि.२२ सप्टेंबर )
शारदिय नवरात्र उत्सवाचा मंगलारंभ आज देशभर होत असताना, तुळजापूर नगरीत देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटणार आहे.घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत लाखो भक्तगण तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने केलेली भाविकांसाठीची सोय ही यंदाच्या नवरात्रात खास आकर्षण ठरत आहे.
नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये नव्या ५० बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावणार असून तुळजापुरातील नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत दोन्ही बसस्थानकाचे नामकरण अनुक्रमे *श्री. तुळजाभवानी बसस्थानक व छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक* असे करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे झाले.यावेळी पोलीस अधीक्षक रितु खोखर,एसटी महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के व विभाग नियंत्रक विनोद भालेराव हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना परिवहन मंत्री तथा पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, आई तुळजाभवानीच्या सेवेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटीचे चालक, वाहक व कर्मचारी यांच्या श्रमाला उत्साहाची नवी उर्जा मिळावी म्हणून यंदा ५० नव्या बसेसची भर घालण्यात आली आहे.या बसेस खास भक्तांच्या प्रवासासाठी तुळजापूर मार्गावर धावणार असून,भाविकांना सुखरूप व सोयीस्कर प्रवासाची हमी देणार आहेत.
इतकेच नव्हे तर,दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरातून तब्बल ११०० बससेवा सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांसाठी ही सोय म्हणजे सुरक्षित व किफायतशीर प्रवासाची मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
तुळजापूरकरांची अनेक दिवसांची मागणीही यंदा पूर्ण होत आहे.आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर तुळजापूरातील दोन बसस्थानकांचे नामकरण करण्यात आले.मुख्य बसस्थानकाला “श्री तुळजाभवानी बसस्थानक तुळजापूर” हे नाव देण्यात आले असून, दुसऱ्या महत्त्वाच्या बसस्थानकाला “छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक तुळजापूर” असे गौरवपूर्ण नाव देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली.
पालकमंत्री प्रताप सरनाईक या प्रसंगी बोलताना म्हणाले की,या नामकरणामुळे भक्तिभाव, ऐतिहासिक स्मरण व सांस्कृतिक अभिमान यांचा संगम साधला गेला आहे.आई तुळजाभवानीच्या चरणी नव्या नावाचा हा मंगल प्रसाद अर्पण झाल्याने स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एसटी महामंडळाकडून भाविकांच्या सेवेसाठी उचललेले हे पाऊल हे फक्त सोयीपुरते नाही,तर ती आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठीची नवी वाहतूक-यज्ञसेवा ठरणार आहे.
“आई तुळजाभवानीचा आशीर्वाद एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांवर व भाविक प्रवाशांवर सदैव राहो,”अशी कृतज्ञ भावना व्यक्त परिवहन मंत्री तथा पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.




