धाराशिव / प्रतिनिधी :- (दि.२२ सप्टेंबर)
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील उमरगा,भूम व परंडा तालुक्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे महापूराची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.विशेषतः परंडा व भूम तालुक्यात पूरस्थिती गंभीर बनली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.९२ गावे बाधित होऊन ६२ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बचावकार्य वेगाने सुरू
पूरग्रस्त भागात इंडियन आर्मी, एनडीआरएफ व एसडीआरएफचे जवान दाखल झाले असून हेलिकॉप्टर व बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.यामध्ये लाखी गावातील १२ जणांना बोटीने,रुई येथील १३ जणांना बोटीने,वडनेर-देवगाव (खु.) येथील २६ जणांना हेलिकॉप्टरने,भूम तालुक्यातील तांबेवाडीतील ६,इट येथील १ व इडा येथील ७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.परंडा तालुक्यातील घाटपिंपरी,वागेगव्हाण व वडनेर परिसरात सुमारे १५० नागरिकांची जवानांनी सुटका केली.
देवगाव (खु.) येथे परंडाचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.
प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे पूरग्रस्त भागात असून यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.भूम उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे,तहसीलदार निलेश काकडे यांच्यासह महसूल,पोलीस व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पूरग्रस्त भागात तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.ते पूरग्रस्त भागातील गावात पाहणी करत आहेत.
*शेतीपिकांचे मोठे नुकसान*
दि. २० ते २२ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ हजार २९ शेतकऱ्यांचे पिके बाधित झाली आहेत.यात प्रामुख्याने जिरायत पिके तर काही प्रमाणात बागायती पिकेही नुकसानग्रस्त झाली आहेत.
पाझर तलाव फुटले
भूम तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक पाझर तलाव फुटले असून वारेवडगाव,पाठसांगवी,हिवरडा, वालवड चुंबळी,मोहितेनगर वालवड व वालवड पाझर तलाव बाधित झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी जनावरे व कुटुंबियांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




