धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
उमरगा व लोहारा तालुक्यातील लमाण, वडार, बेरड या भटक्या व मुक्त जमातींच्या तांडा-वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या सामर्थ्य संस्थेने महिलांच्या सुरक्षित प्रवास व आरोग्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. मागील १५ वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून वंचित समुदायातील महिलांचे आर्थिक, सामाजिक व राजकीय सक्षमीकरणाचे काम सुरू आहे.
सध्या या भागातील महिला उडीद व सोयाबीन काढणीच्या कामात मोठ्या प्रमाणावर गुंतलेल्या आहेत. कामासाठी त्यांना तांड्यावस्तीपासून साधारण २५ किमी अंतरावरच्या गावांमध्ये रोज प्रवास करावा लागतो. रिक्षा, टमटम किंवा ट्रॅक्टरवर क्षमतेपेक्षा जास्त महिलांना बसावे लागते. त्यामुळे जीवितास धोका निर्माण होतो.
या धोक्याची जाणीव ठेवून सामर्थ्य संस्थेने विविध तांड्यात महिलांमध्ये बैठकीद्वारे सुरक्षित प्रवासाची जनजागृती केली. महिलांना “प्रवास करताना काय काळजी घ्यावी” याची माहिती देण्यात आली. तसेच शेतमजुरीदरम्यान हात-पायांना होणाऱ्या जखमांचा विचार करून प्रत्येक गटाला प्राथमिक उपचार पेटी देण्यात आली व त्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले गेले.
याशिवाय, महिलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकांनाही प्रशिक्षित करण्यात आले. वाहतूक नियम, प्रवाशांची सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबाबत माहिती देण्यात आली. दहा तांड्यातील सुमारे ३० रिक्षा चालकांना प्रशिक्षण देऊन प्रत्येक रिक्षामध्ये आपत्कालीन मदत क्रमांकांची फलक लावण्यात आली.
या उपक्रमाद्वारे एकूण ५०० पेक्षा जास्त महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. सुरक्षित प्रवास, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या इजा व त्यावर उपाय, तसेच समुदायात महिलांच्या सक्षमीकरणासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.या उपक्रमामुळे गावोगावी महिलांना “आपला प्रवास सुरक्षित कसा करायचा” याची जाणीव होत असून, चालकांमध्येही जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. या उपक्रमाची माहिती देताना संस्थेच्या प्रमुख रंजिता पवार यांनी महिलाच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असल्याचे नमूद केले कारण महिलावर संपूर्ण घराची जबाबदारी असते त्यांना मानसिक आधार सुद्धा देणे गरजेचे आहे. उपक्रमासाठी बबिता राठोड, गिरिजा राठोड , दीपा जाधव , कविता राठोड, अश्विनी राठोड ,प्रियंका पवार यादी कार्यकत्यांनी मेहनत घेतली.