तुळजापूर / प्रतिनिधी :- चंद्रकांत हागलगुंडे ( दि.3)
पंतप्रधानांच्या संकल्पनेतून गरीब, निराधार, राहण्यासाठी ज्यांना आसरा नाही अशा गरजूंना स्वतः व कुटुंबासाठी राहण्यासाठी हक्काचे घर असावे या उदात्त हेतूने देशभर ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचा बट्ट्याबोळ होत असून निव्वळ स्व.हित कसे साधता येईल यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून दलालांचे मात्र चांगभले होत असल्याने तीव्र संताप व चीड व्यक्त केले जात आहे. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात घरकुल नावालाच असून पैसे मात्र खात्यावर पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची व अधिकारी व दलांची वरिस्टामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
अणदूर ग्रामपंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास 885 घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यादीतील लाभार्थ्याकडून प्रत्येक हप्त्याला दलाला कडून काही रक्कम घेतली जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. शासन विविध योजना समाज उपयोगी राबवत असले तरी झारीतील शुक्राचार्य मात्र हात मारून घेत असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान व मुख्यमंत्री ही आवास योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी अधिकारी व दलालांच्या तेरी भी चूप, मेरी भी चुप कारभारामुळे ही योजना कागदावरच राहणार का असा प्रश्नही ऐकावयास मिळत आहे.
प्रत्यक्षात घरकुलाचे काम नाही, घरकुलाचा ठाव ठिकाणा नाही तरीही चिरीमिरी देऊन हप्ता खात्यावर पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही योजना खऱ्याखुऱ्या गरजवंतासाठी की दलांचे खिसे भरण्यासाठी असा संतप्त सवाल ऐकावयास मिळत आहे.
आजतागायत मंजूर झालेल्या प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या व नसलेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.