धाराशिव प्रतिनिधी :-
धाराशिव जिल्ह्यात १४ ऑगस्टपासून कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे.दरम्यान पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याच अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार तालुका कृषी अधिकारी ए. जे. देशमुख यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतीतील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी, बोरनदवाडी नळ, वडगाव देव या गावांना भेट देण्यात आली. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून झालेल्या नुकसानीचा आणि पुढील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत, शासनस्तरावरून तातडीची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीदरम्यान माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, दीपक आलूरे, दयानंद मुडके आदी उपस्थित होते.
- Advertisement -