पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या विरोधात पत्रकार एकवटले
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी)
पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर तुळजापूर येथील ड्रग प्रकरण आदींसह विविध मुद्द्याबाबत पत्रकारांनी वास्तव मांडल्यामुळे पत्रकारांना टार्गेट करीत बघून घेईन, आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यानंतर पत्रकारांचे काय होईल ? यासह इतर प्रकारच्या धमक्या देण्याचे प्रकार हल्ली वाढलेले आहेत. त्यामुळे पत्रकारांना धमकावणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे पत्रकारांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे दि.२५ ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मागील अनेक वर्षांपासून समाजातील घडामोडी, जनहिताचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रामाणिकपणे जनतेपर्यंत आम्ही पोहोचवत आहे.परंतु अलीकडील काळात आमच्यावर अन्याय, दडपशाही व खोट्या आरोपांचा प्रयत्न करण्यात येत आहे.
काही दिवसापूर्वी अवैध धंदे सरसकट का बंद केले जात नाहीत ? याबाबत दैनिक प्रजापत्रचे भूम तालुका प्रतिनिधी चंद्रमणी गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांना प्रश्न विचारला त्यावेळी तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करता का ? असे म्हणत एनसी दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांना एफआयआर प्रत देण्यास नकार देण्यात आला. तसेच धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांनाही तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक मांजरे यांच्याकडून धमकावण्यात आले. तर तुळजापूर येथील आनंद कंदले यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ढेपे यांना बघून घेऊ म्हणत पोलीस तक्रार करण्यात आली आहे.
पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करणे, त्यांच्यावर हल्ला व जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधितांना जबाबदार धरावे. कारण आनंद कंदले यांनी पोलिस अधीक्षक यांच्या समोरच कार्यकर्त्याचा प्रक्षोभ झाला असून अनुचित प्रकार होईल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे अशा दबावात पत्रकार बातमीदारी कशी करणार ? असा प्रश्न पत्रकारापुढं पडला आहे.विशेष म्हणजे पत्रकारितेला लोकशाहीतील चौथा स्तंभ मानले जाते. सत्य वार्तांकन करणे हा पत्रकारांचा घटनात्मक अधिकार आहे. परंतू अशा प्रकारच्या अन्यायामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाही धोक्यात येत आहे.
त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, धमक्या किंवा खोट्या गुन्ह्यांची तात्काळ चौकशी करावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा.
वार्तांकन करताना पत्रकारांच्या सुरक्षेची हमी द्यावी. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत.
यावेळी हुंकार बनसोडे, राजाभाऊ वैद्य, संतोष जाधव, बालाजी निरफळ, रहीम शेख, चंद्रसेन देशमुख, सयाजी शेळके, महेश पोतदार, शीला उंबरे, आकाश नरोटे, जुबेर शेख, किरण कांबळे, आतिक सय्यद, युसुफ मुल्ला, वैभव पारवे, सुभाष कदम, किशोर माळी, आयुब शेख, मुस्तफा पठाण, प्रमोद राऊत, कलीम शेख, पांडुरंग मते, मल्लिकार्जुन सोनवणे, अमजद सय्यद, गणेश जाधव, संतोष शेटे, कुंदन शिंदे, राकेश कुलकर्णी, विशाल जगदाळे, जब्बार शेख, कलीम सय्यद, सुरेश चव्हाण आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.