17 मंडळांच्या 1020 पदाधिकाऱ्यांनंतर आता 70 सदस्यांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
धाराशिव प्रतिनिधी :-
भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा भाजपाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या प्रक्रियेत माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य, नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, यांचे सहकार्य लाभले. नव्या कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस,चिटणीस आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदांवर एकूण 70 पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 17 मंडळांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. त्या प्रक्रियेत तब्बल 1,020 पदाधिकाऱ्यांची निवड होऊन पक्षसंघटना गावागावात अधिक मजबूत झाली होती. आता या जिल्हास्तरीय कार्यकारिणीमुळे पक्षाचे काम तालुक्यापासून जिल्हास्तरापर्यंत आले असून भाजपचे काम आणखी गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी या प्रसंगी सांगितले की,भाजपाची संघटनबांधणी ही कार्यकर्त्यांच्या सहभागातून घडत आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांसाठी हीच कार्यकारिणी पक्षाचे भक्कम बळ ठरेल. या नियुक्त्यांमुळे पक्षातील अनुभवी नेते आणि नव्या पिढीतील कार्यकर्ते एकत्र येऊन अधिक प्रभावीपणे पक्षधोरण जनतेपर्यंत पोहोचवतील, असा विश्वास पक्षनेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या निवडीबद्दल माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सर्वाचे अभिनंदन केले आहे.