धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
लोहारा तालुक्यातील भोसगा येथील अंगणवाडी क्रमांक १६ मध्ये दिनांक ६ ऑगस्ट रोजी स्तनपान सप्ताह व पोषण आहार कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच मुकेश सोनकांबळे यांनी स्तनपानाचे महत्त्व, आहार साक्षरता, तसेच बाळाचे पहिल्या १००० दिवसांचे आरोग्यदायी महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर आशा कार्यकर्त्या हारुबाई कागे आणि शितल सोनकांबळे यांनी लसीकरणाचे महत्त्व विशद करत उपस्थित महिलांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी मदतनीस साळू गायकवाड यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अंगणवाडी कार्यकर्ती सविता कागे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका प्रयाग चौधरी, कविता पवार, राजश्री थाटे, सविता कागे, साळू गायकवाड, तसेच आशा कार्यकर्त्या हारुबाई कागे, शितल सोनकांबळे आणि उमा बिराजदार यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्तनपान, पोषण आहार आणि बालकांचे आरोग्य याविषयी माहिती आत्मसात केली व सक्रिय सहभाग नोंदवला.