spot_img
26.6 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पर्यटनातून रोजगारनिर्मितीला प्रथम प्राधान्य लवकरच पर्यटनस्थळांचा एकत्रित प्रारूप आराखडा

धाराशिव प्रतिनिधी –

धाराशिव जिल्ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक आणि प्राचीन पर्यटनस्थळांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे शक्तिपीठ आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या भक्तिपीठाचे त्याला मोठे आशीर्वाद लाभलेले आहेत. पर्यटन विकासाच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मितीला प्रथम प्राधान्य देत आहोत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांचा एकत्रित प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे ‘मित्र’ चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व आर्थिक सबलीकरणाच्या हेतूने नळदुर्ग, येडशी, तेर व येरमाळा आदी पर्यटन स्थळांचा एकात्मिक विकास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘मित्र’ संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या उत्पन्न वृद्धीवर भर देत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यावर नियोजनबद्ध काम सुरू आहे. त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहेत. या अनुषंगाने पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील या चार पर्यटन स्थळांचा प्रारुप एकात्मिक विकास आराखडा २० ऑगस्ट २०२५ पर्यंत करण्याचे ठरले आहे. या बैठकीस तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रकाश अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती. शोभा जाधव, तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे, तहसीलदार अभिजित जगताप, पर्यटन विभागाच्या श्रीमती जया वहाने, सल्लागार श्रीमती नेहा शितोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नळदुर्ग येथील किल्ला व सभोवतालच्या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर करत विकास साधला जाणार आहे. तसेच बसवसृष्टी व वसंतराव नाईक स्मारकासह इतर बाबींचा विचार करून ‘ रोप-वे’, ‘ हॉट एअर बलून’ यासारख्या साहसी क्रीडा प्रकारांचा देखील या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. येडशी येथील रामलिंग अभयारण्यासह श्री क्षेत्र रामलिंग मंदिर व परिसराचा विकास, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला दुर्गादेवी डाक बंगला, जुनी रेल्वेलाईन व स्टेशन तथा जुने विठ्ठलवाडी गाव मूळ ऐतिहासिक रूपात पुन्हा एकदा नव्याने साकारण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ख्याती असलेल्या श्री क्षेत्र आई येडेश्वरी देवीमंदिर परिसरात आवश्यक भूसंपादनासह एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राचीन ‘तगर’चा इतिहासाला असलेली वैभवशाली प्राचीन झळाळी पुन्हा एकदा यानिमित्ताने मिळणार आहे. राज्यातील सर्वात प्राचीन मंदिर असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. या सगळ्या विकास कामांसह तेर गावाचादेखील स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जात आहे. त्यातून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळून त्यातून स्थानिक रोजगार निर्मिती वाढेल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या