धाराशिव न्युज रिपोर्टर:- विजय पिसे जळकोट
शिक्षण हीच खरी संपत्ती असून वंचित, भटक्या व मागासवर्गीय समाजातील तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा, याच उद्देशाने सामर्थ्य कल्याणकारी संस्था, उमरगा यांच्या वतीने एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. संस्थेने उमरगा तालुक्यातील लमाण (बंजारा), वडार, बेडर आणि कैकाडी या पारंपरिकदृष्ट्या शिक्षणापासून वंचित समाजातील १०वी व १२वीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या एकूण ७५ विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी राठोड उपस्थित होते. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी शिक्षणाचे महत्व विशद करताना सांगितले की, “ आजच्या स्पर्धात्मक जगात मागे पडलेल्या समाज घटकातील तरुणांनी फक्त शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवणे पुरेसे नाही, तर ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास यावर भर देणे आवश्यक आहे. तरच आपण समतेकडे वाटचाल करू शकतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यवसायाभिमुख शिक्षण याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.त्यांनी ग्रामीण व वंचित समाजातील पालकांनी आपल्या मुलांना शिकवण्याच्या गरजेवरही भर दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबिता राठोड होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित नसून, ही पुढील वाटचालीसाठी दिली जाणारी प्रेरणा आहे. संस्थेचा उद्देश म्हणजे वंचित समाजातील मुले, मुली शिक्षणाच्या प्रवाहात येऊन सक्षम नागरिक बनावेत. यावेळी सविता राठोड, रेणुका राठोड या प्रमुख पाहुण्यांच्या विशेष उपस्थिती होती .
कार्यक्रमाची सुरुवात पूजा राठोड यांच्या सुमधुर प्रार्थनेने झाली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. संविधानातील मूल्ये व ती आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्वाची आहेत, यावर अतिथींचे मोलाचे मार्गदर्शन झाले.
प्रस्ताविक बबिता राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन दिशा राठोड यांनी केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व पाहुण्यांचे आभार मानले. सामर्थ्य संस्थेच्या वतीने असा स्तुत्य उपक्रम राबवून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्ववितेसाठी संस्थेचे प्रेरक ,कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .